तासगावकरांवर गुन्हे असल्याने कारखान्याची भागिदारी तोडली
By Admin | Updated: October 5, 2014 00:18 IST2014-10-05T00:18:21+5:302014-10-05T00:18:52+5:30
फलटण : रामराजे नाईक-निंबाळकर यांची माहिती

तासगावकरांवर गुन्हे असल्याने कारखान्याची भागिदारी तोडली
फलटण : ‘आमच्या नावावर ऊस व विश्वास संपादन करून साखर कारखान्याच्या माध्यमातून डॉ. नंदकुमार तासगावकर राजकारणात येणार, अशी कुणकुण लागल्यामुळे आणि त्यांच्याच आर्थिक व्यवहाराबाबतही ४२० कलमाखालील गुन्हे दाखल असल्याचे लक्षात आल्यावर कारखान्याची भागीदारी तोडली,’ अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली.
पत्रकार परिषदेस संजीवराजे नाईक-निंबाळकर, बाजार समिती अध्यक्ष रघुनाथ नाईक-निंबाळकर उपस्थित होते. रामराजे म्हणाले, ‘बरड, ता. फलटण येथे साखर कारखाना उभारणीबाबत डॉ. नंदकुमार तासगावकर यांच्याशी सहा महिन्यांपूर्वी ठरले होते. व त्या पद्धतीने चर्चा सुरू होती. डॉ. तासगावकरांशी माझे बोलणे पण झाले की, तुम्हाला राजकारणात यायचं का? कारखाना काढायचा? तेव्हा डॉ. तासगावकर म्हणाले, ‘मी राजकाणार येणार नाही.’ परंतु ते राजकारणात येणार ही कुणकुण लागली होती. तासगावकरांच्या आर्थिक व्यवहाराबाबतही काही गोष्टी कानावर आल्या होत्या. ४२० सारखे गंभीर फौजदारी आठ गुन्हे तासगावकर यांच्यावर दाखल आहेत. कुणाला पाहायचे असेल, तर त्यांनी उमेदवारी दाखल करताना जे प्रतिज्ञापत्र दिले आहे. ते कुणालाही पाहण्यास सहज उपलब्ध होते. त्यात पाहू शकतात. आम्ही तालुक्यात तीन पिढ्या राजकारण केले. तालुक्याबाहेरील व्यक्ती राजकारण करावे हे न पटणारे आहे. तासगावकराना फक्त एवढ्यापुरताच वापर डॉ. तासगावकरांना करायचा होता. म्हणून कारखाना भागीदारी तोडली आहे.’
यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)