पुरेसे पर्जन्यमान झाल्याने जिल्ह्यातील टँकर बंद...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:26 IST2021-07-21T04:26:08+5:302021-07-21T04:26:08+5:30
सातारा : जिल्ह्यात पुरेसे पर्जन्यमान झाल्याने सर्व तालुक्यांतील टँकर बंद करण्यात आले आहेत. तर यावर्षी जिल्ह्यात टंचाईची स्थिती एकदम ...

पुरेसे पर्जन्यमान झाल्याने जिल्ह्यातील टँकर बंद...
सातारा : जिल्ह्यात पुरेसे पर्जन्यमान झाल्याने सर्व तालुक्यांतील टँकर बंद करण्यात आले आहेत. तर यावर्षी जिल्ह्यात टंचाईची स्थिती एकदम कमी राहिली आहे.
जिल्ह्यात तीन-चार वर्षांतून दुष्काळ पडतो. त्यातच पाऊस झाला तरी माण, खटाव, फलटणसारख्या तालुक्यांत डिसेंबरनंतर टँकर सुरू करायला लागायचे. पण, गेल्या काही वर्षांत हे चित्र बदलले आहे. याला कारण म्हणजे जलसंधारणाची कामे. त्याचबरोबर वॉटर कप स्पर्धेमुळे तर पाणी साठवण्याचे तुफान आलेले. यामुळे माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झालेली. परिणामी पावसाचे पडलेले पाणी अडून राहिले व त्याचा फायदाही झाला. परिणामी जिल्ह्यातील टंचाईही कमी झाली.
जिल्ह्यात यावर्षी ऐन उन्हाळ्यात १३८ गावांना टंचाई भासण्याचा अंदाज होता. त्यासाठी ४६ टँकर लागणार होते. तर अडीच कोटींचा खर्च अपेक्षित होता. असे असले तरी यंदा टंचाई कमी जाणवली. यावर्षी मार्च महिन्यात जिल्ह्यात पहिला टँकर सुरू झाला. वाई, माण, पाटण आणि कऱ्हाड या तालुक्यात सुरुवातीला टँकर सुरू झाले. त्यानंतर काही तालुक्यांत सुरुवात झाली. यावर अनेक गावचे ग्रामस्थ तसेच पशुधनही अवलंबून होते.
जून महिन्याच्या उत्तरार्धात १२ गावे आणि १४ वाड्यांसाठी ७ टँकर सुरू होते. या टँकरवर ९ हजार नागरिक आणि १७८० पशुधन अवलंबून होते. मात्र, त्यानंतर पुरेसे पर्जन्यमान झाल्याने मागील आठवड्यापासून जिल्ह्यातील टँकर बंद करण्यात आले आहेत. यामुळे टंचाईवरील खर्च वाचला आहे.
चौकट :
विहिरींचे अधिग्रहण...
जिल्ह्यात पाऊस झाल्याच्या कारणामुळे टँकर बंद झाले आहेत. असे असले तरी वाई आणि खटाव तालुक्यात विहीर अधिग्रहण सुरू आहे. अधिग्रहण केलेल्या विहिरींच्या माध्यमातून ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
..........................................................