तमाशा कलावंतांचे प्रश्न सोडविणार : बनसोडे
By Admin | Updated: June 11, 2015 00:53 IST2015-06-10T21:46:11+5:302015-06-11T00:53:46+5:30
कोपर्डे हवेली : तमाशा फडमालक व कलावंतांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार

तमाशा कलावंतांचे प्रश्न सोडविणार : बनसोडे
कोपर्डे हवेली : ‘तमाशा फडमालक व कलावंतांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार आहे,’ अशी ग्वाही तमाशासम्राज्ञी मंगला बनसोडे यांनी दिली.लोकनाट्य तमाशा फडमालक व कलावंतांचा राज्यस्तरीय मेळावा मंगळवारी करवडी, ता. कऱ्हाड येथे पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या. मंगला बनसोडे यांची पु. ल. देशपांडे अकादमीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल तमाशा मालक, चालक, कलावंतांच्या व मराठी तमाशा परिषदेच्या वतीने त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
अध्यक्षस्थानी पंढरपूर नगरपरिषदेचे नगरसेवक सुखदेव माने होते. प्रमुख पाहुणे रघुवीर खेडकर होते. लोकनाट्य तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव, बजरंग केरार, मुसा इनामदार, अविष्कार मुळे, तानाजी वाघेरीकर, साहेबराव नांदोलेकर, संपतराव खाडे, नौशाद जमादार, रामभाऊ बनसोडे, नितीन बनसोडे, गफुरभाई पुणेकर आदी उपस्थित होते.
यावेळी रघुवीर खेडकर म्हणाले, ‘महाराष्ट्र शासनाने मंगला बनसाडे यांची पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या सदस्यपदी केलेली निवड हा तमाशा कलावंतांच्या कलेचा सन्मान आहे. असे कौतुक सर्व कलवंतांचे होणे गरजेचे आहे. त्यासाठी तमाशा कलावंतांनी समाजामध्ये मिसळले पाहिजे. तुम्ही समाजाला स्वीकारा, समाज तुम्हाला स्वीकारेल. सर्व कलावंतांनी एकत्र येऊन समाजाच्या सुख-दु:खात सहभागी व्हावे. तमाशा कलावंतांनी आपला व्यवसाय करत ज्येष्ठ कलावंतांचा सन्मान केला पाहिजे. त्यासाठीच समिती गठित होणे आवश्यक आहे.’
मुसाभाई इनामदार, उत्तम पिसाळ, संभाजीराजे जाधव, शांताबाई कऱ्हाडकर यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी करवडी तंटामुक्तीचे अध्यक्ष उत्तम पिसाळ, तमाशा कलावंतांची, मालकांची उपस्थिती होती. संभाजीराजे जाधव यांनी सूत्रसंचालन केले. उत्तम पिसाळ यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)