नगरभूमापन केंद्रात कुलपाचंच दर्शन
By Admin | Updated: December 19, 2014 00:30 IST2014-12-18T21:33:57+5:302014-12-19T00:30:09+5:30
मायणी : अधिकारी उपस्थित नसल्याने नागरिकांची होतेय गैरसोय

नगरभूमापन केंद्रात कुलपाचंच दर्शन
मायणी : खटाव तालुक्यातील पूर्वभागातील नागरिकांच्या सोयीसाठी मायणी येथे नगरभूमापन केंद्र सुरू केले असून, या कार्यालयातील अधिकारी वेळेवर येत नसल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे.
मायणी व परिसरातील कलेढोण, म्हासुर्णे, कातरखटाव (येरळवाडी), एनकूळ, निमसोड व विखळे आदी भागातील नागरिकांच्या सोयीसाठी आठवड्यातून एकदा (दर शुक्रवारी) नगरभूमापन विभागाकडून कार्यालय सुरू करण्यात आले आहे. आठवड्यातून एक दिवस असल्याने परिसरातील अनेक ग्रामस्थ या ठिकाणी शुक्रवारी गर्दी करीत असतात. या कार्यालयात नियुक्त असणारे पदाधिकारी ११ ते ५ या वेळेत हजर राहणे गरजेचे असतानाही हे अधिकारी मात्र दुपारपर्यंत आलेलेच नसतात. त्यामुळे अनेकांची कामे खोळंबली जातात व येण्या-जाण्याचा भुर्दंड सोसावा लागतो. त्यामुळे हे कार्यालय असून अडचण नसून खोळंबा, अशी स्थिती निर्माण झालेली आहे. (वार्ताहर)