अंतिम घडामोडीसाठी तहाची बोलणी
By Admin | Updated: April 29, 2016 00:25 IST2016-04-28T21:35:34+5:302016-04-29T00:25:24+5:30
भाजपची भूमिका टिष्ट्वस्ट : सूचनापत्र घरी; नगरसेवक मात्र लोणंदबाहेर--कौन बनेगा नगराध्यक्ष ?

अंतिम घडामोडीसाठी तहाची बोलणी
लोणंद : लोणंद नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी राजकीय हालचालींनी वेग घेतला आहे. अंतिम घडामोडीसाठी सर्वच पक्षांची तहाची बोलणी सुरू आहे. निवडून आलेल्या सर्वच नगरसेवकांना निवड प्रक्रियाच्या सूचना प्रशासनाने जारी केल्या आहेत. सूचनापत्र घरच्यांकडे तर नगरसेवक लोणंदबाहेर, अशी अवस्था असल्याने पहिला नगरध्यक्ष लोणंदबाहेरूनच ठरवून येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. दरम्यान, भाजपाच्या टिष्ट्वस्ट भूमिकेमुळे सर्वांच्या नजरा निर्णयाकडे लागल्या आहेत.
दि. ४ मे रोजी होणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी आमदार मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीने अंतिम बोलणीकडे झेप घेतली आहे. मात्र भाजपाने निर्णायक भूमिका जाहीर केलेली नाही. काँग्रेसचेही वरिष्ठ पातळीवरून सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सत्ता कोणाची? हा एकाच विषयावर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
भाजपाने सुरुवातीला काँग्रेससोबत सत्तास्थापनेसाठी जवळीक साधली. मात्र, त्यानंतर राष्ट्रवादीशीही संधान साधल्यामुळे नाट्यमय घडामोडी घडत गेल्या. सत्तेच्या डावातील सोंगट्या उलट्या-सुलट्या पडत गेल्या. त्यामुळे भाजपाच्या भूमिकेमुळे अधांतरी अवस्था निर्माण झाली आहे. मात्र, भाजपाचे नगरसेवक राष्ट्रवादीच्या गोटात असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. त्यामुळे चर्चा वरिष्ठांशी अन् नगरसेवक विरोधकांकडे असे चित्र निर्माण झाले आहे.
याबाबत भाजपाचे नेते पुरुषोत्तम जाधव म्हणाले, ‘लोणंदमध्ये कोणासोबत जायचे याचा अंतिम निर्णय घेतलेला नाही. लोणंदच्या वीस टक्के जनतेने भाजपाला मतदान करून विश्वास दाखवला आहे. त्यांच्या भावनांचाही विचार करावा लागणार आहे. योग्य पर्याय समोर न आल्यास आम्ही विरोधी बळावर बसल्याचीही भूमिका घेऊ शकतो. आमचा निर्णय आम्हीच घेणार आहे.’
पुरुषोत्तम जाधव यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे भाजपाच्या अंतर्गत हालचाली नक्की काय? याबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र सर्व पर्याय तपासून पाहण्याची भूमिका घेतली आहे. आता राष्ट्रवादी कोणाची साथ घेणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे. (प्रतिनिधी)