तलाठी, कोतवालाला लाच घेताना पकडले
By Admin | Updated: February 20, 2015 23:11 IST2015-02-20T22:39:32+5:302015-02-20T23:11:31+5:30
जमिनीचा दस्त तसेच कूपनलिकेची नोंद करण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना

तलाठी, कोतवालाला लाच घेताना पकडले
वडूज : खरेदी केलेल्या जमिनीचा दस्त तसेच कूपनलिकेची नोंद करण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना खटाव तालुक्यातील तलाठी विलास नारायण खाडे आणि कोतवाल तानाजी मारुती मदने या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रंगेहाथ पकडले.खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली सजाचा तलाठी म्हणून विलास खाडे कार्यरत असून, त्याच्याकडे लोणी सजाचाही अतिरिक्त कार्यभार आहे. आपल्या आईने खरेदी केलेल्या जमिनीचा दस्त करण्यासाठी तसेच कूपनलिकेची नोंद करण्यासाठी त्याने त्याचा मदतनीस कोतवाल तानाजी मदने याच्याकरवी लाच मागितल्याचे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला १६ फेब्रुवारी रोजी कळविले होते. तक्रारदाराच्या आईने लोणी येथे जमीन खरेदी केली असून, त्यांच्या आत्याच्या पतीनेही तेथेच काही जमीन खरेदी केली आहे. या जमिनीच्या दस्ताची नोंद करण्यासाठी विलास खाडेने पाच हजार रुपयांची लाच लोणी सजाचा कोतवाल तानाजी मदने याच्याकरवी मागितली होती.ही रक्कम तक्रारदाराकडून शुक्रवारी दुपारी सिद्धेश्वर कुरोली ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर स्वीकारताना मदने याला सापळा रचून रंगेहाथ पकडण्यात आले. या दोघांविरुद्ध वडूज पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. (प्रतिनिधी)