रहिमतपूर : हक्कसोड पत्राच्या दस्ताची नोंद सातबारावर करून देण्यासाठी तक्रारदाराकडून एक हजार रुपयांची लाच घेताना बोरगाव येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. त्याच्यावर लाच घेतल्याप्रकरणी रहिमतपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रणजित अर्जुन घाटेराव (वय ३२, सध्या रा. फ्लॅट नं १, श्री अपार्टमेंट अहिरे कॉलनी लक्ष्मीनगर, सातारा. मूळ रा. मु पो. भौसे, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) अशी गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे.तक्रारदार यांची कोरेगाव तालुक्यातील टकले (बोरगाव) गावातील गट नंबर १०० मधील १० गुंठे शेतजमीन ही त्यांच्या वडिलांच्या नावावर होती. २३ डिसेंबर २०२१ रोजी वडिलांचे निधन झाल्यानंतर तक्रारदार यांचे भाऊ, बहीण व स्वतःचे नाव संबंधित क्षेत्राच्या सातबाऱ्यावर वारस नोंद झाली. त्यानंतर तक्रारदार यांची बहीण हिने विनामोबदला हक्कसोडपत्र भावाचे नावे करून दिले. दि. ३ सप्टेंबर रोजी तक्रारदार बोरगाव येथील तलाठी कार्यालय येथे हक्कसोड पत्राच्या दस्ताची नोंद ही सातबारा सदरी करून देण्यासाठी अर्ज घेऊन गेले. तेथील तलाठी रणजीत घाटेराव यांनी हक्कसोडपत्राच्या दस्ताची नोंद सातबाऱ्यावर घेण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी केली. त्यावेळी तक्रारदार यांनी त्यांना एक हजार रुपये रोख दिले होते. त्यानंतर उर्वरित राहिलेल्या एक हजार रुपयांची लाचेची मागणी तलाठी घाटेराव करीत असल्याबाबतची तक्रार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय सातारा येथे केली. त्यानुसार ९ सप्टेंबर रोजी तलाठी रणजित घाटेराव याने लाचेची मागणी केलेल्या दोन हजार रुपयांमधील राहिलेले एक हजार रुपये घेताना रंगेहात सापडला. त्याच्यावर रहिमतपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग साताराचे पोलिस उपाधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील पाटील, पोलिस हवालदार नितीन गोगावले, पोलिस कॉन्स्टेबल सत्यम थोरात, पोलिस हवालदार निलेश राजपुरे, अजयराज देशमुख आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. तपास सुनील पाटील करत आहेत.
Satara: दस्ताची नोंद सातबाऱ्यावर करण्यासाठी लाचेची मागणी, बोरगाव येथील तलाठ्यास रंगेहाथ पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 18:44 IST