विद्यार्थ्यांचा विकास वाढविण्यासाठी पुढाकार घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:51 IST2021-02-27T04:51:06+5:302021-02-27T04:51:06+5:30
कुसूर: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय शिक्षक प्रयत्नशील असतातच. त्याव्यतिरिक्त ग्रुप ग्रामपंचायतींच्या माध्यमातून योगा, संगीत, संगणक, कला आदी शिक्षकांची ...

विद्यार्थ्यांचा विकास वाढविण्यासाठी पुढाकार घ्या
कुसूर:
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय शिक्षक प्रयत्नशील असतातच. त्याव्यतिरिक्त ग्रुप ग्रामपंचायतींच्या माध्यमातून योगा, संगीत, संगणक, कला आदी शिक्षकांची नेमणूक करून विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक विकास वाढवावा, यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन गटविकास अधिकारी आबासाहेब पवार यांनी केले.
कुसूर (ता. कराड) येथील कोरोना काळात प्राथमिक शाळेत पालकांशी सुसंवाद आणि चौदाव्या वित्त आयोगातून देण्यात आलेल्या शालेय साहित्य लोकार्पण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी शबनम मुलानी, शिक्षण विस्तार अधिकारी जमेला मुलानी, केंद्रप्रमुख सुवर्णा मुसळे, सरपंच शोभाताई पाटील, सदस्या मनीषा सावंत, आकाताई पाटील, ग्रामसेविका जया साळुंखे, भगवान पाटील, हेमंत मोरे, विशाल कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
चौदाव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीच्या वतीने शाळेला १ लाख ६५ हजार रुपयांचे सोलर सिस्टीम, प्रिंटर, साऊंडसिस्टीम आदी शालेय साहित्य देण्यात आले. भगवान पाटील यांनी ३० हजार रुपयांचे शालेय साहित्य तसेच व्यायाम साहित्य दिले. हेमंत मोरे आणि विशाल कदम यांनी शाळेला दोन टॅब भेट दिले.
कोरोना काळात पालकांनी विद्यार्थ्यांची घ्यावयाची काळजी तसेच ऑनलाईन शिक्षणाचे महत्त्व, पालकांनी विद्यार्थ्यांना किती वेळ मोबाईल द्यावा, त्याचे चांगले-वाईट परिणाम, याविषयी सुसंवाद साधला. शालेय शिक्षणाव्यतिरिक्त मुलांना योगा, कला, संगणक आणि संगीताचे ज्ञान मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी चार-पाच ग्रामपंचायतींनी एकत्र येऊन शिक्षकांची नेमणूक करून त्यांचा पगार द्यावा, असे पवार म्हणाले.
मुख्याध्यापक नीलम नायकवडी यांनी प्रास्ताविक केले. सुरेखा आवळकर यांनी आभार मानले.
चौकट :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुसूर ही जिल्ह्यातील पहिली डिजिटल आणि आता सोलर सिस्टीम बसविण्यात आलेली शाळा आहे.