कचरा फेकणाऱ्यांचे थेट फोटो काढा
By Admin | Updated: December 12, 2015 00:06 IST2015-12-11T22:59:53+5:302015-12-12T00:06:49+5:30
वेदांतिकाराजे भोसले : विद्यार्थी शिक्षकांच्या बैठकीत आवाहन

कचरा फेकणाऱ्यांचे थेट फोटो काढा
सातारा : ‘प्रत्येक शाळेने प्रत्येकी पाच लहान (१४ वर्षांखालील) मुलांचे पथक करून, त्या मुलांना एक कॅमेरा अथवा मोबाइल द्यावा. त्या मुलांना कचरा साचणाऱ्या ठिकाणी अर्धा तास उभे करावे, आणि तिथे कचरा टाकणाऱ्या व्यक्तीचे फोटो काढून त्याचे फलक लावल्यास कचरा उघड्यावर टाकणाऱ्यांची संख्या घटेल,’ असे प्रतिपादन कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका वेदांतिकाराजे भोसले यांनी केले. येथील पालिकेच्या मंगल कार्यालयात शहरातील विविध शाळा, मुख्याध्यापक,शिक्षक, प्रतिनिधी यांची बैठक झाली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उपनगराध्यक्ष जयवंत भोसले, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजित बापट, आरोग्य विभागाच्या सभापती अंजली माने, नगरसेवक सचिन सारस, भाग्यवंत कुंभार, लिना गोरे, दीपलक्ष्मी नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. या अभियानामध्ये शाळा, विद्यालये आणि महाविद्यालयातील विद्यार्थी स्वच्छता दूत म्हणून काम करणार असून, सातारा स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी आवश्यक ते योगदान देण्याचा निर्णय मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी जाहीर केला. कर्तव्य सोशल ग्रुपच्या वतीने स्वच्छ, सुंदर आणि निरोगी सातारा शहराचे स्वप्न साकार करण्यासाठी स्वच्छता जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. बैठकीच्या सुरुवातीला कर्तव्य सोशल ग्रुपने शहरात साचणाऱ्या कचऱ्याच्या ढिगांच्या ठिकाणांची चित्रफीत दाखवण्यात आली. यानंतर या कचऱ्याचे निर्मूलन व्हावे, यासाठी काय उपाययोजना करता येतील? याबाबत चर्चा करण्यात आली. मुख्याधिकारी बापट यांनी स्वच्छतेसाठी नगरपालिका प्रशासन कमी पडत असल्याची खंत व्यक्त केली. मात्र, कर्तव्य सोशल ग्रुपच्या अभियानामुळे पालिका प्रशासन पुन्हा चार्ज झाले असून, शहराच्या स्वच्छतेसाठी विविध उपाययोजना करत असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व उपक्रमांची पालिका अंमलबजावणी करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिक्षकांनी सुचवलेल्या सर्व सूचनांचे वेदांतिकाराजे यांनी स्वागत केले. शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या भव्य स्वच्छता जनजागृती रॅलीचे आयोजन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच वार्डा- वार्डात आठवड्यातून एकदा स्वच्छता मोहीम राबविण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. ही योजना सर्वच शिक्षकांनी उचलून धरली. हा उपक्रम राबविण्यासाठी उपस्थितांपैकी बहुतांश सर्वच शाळांचे प्रतिनिधींनी उत्स्फूर्तपणे हात उंचावले. येत्या आठ दिवसांत हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. (प्रतिनिधी)