मलटणमधील गुन्हेगारांचा बंदोबस्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:13 IST2021-02-06T05:13:50+5:302021-02-06T05:13:50+5:30
मलटण : फलटणचे एक सुंदर व झपाट्याने विकसित होत असलेले उपनगर म्हणून मलटणची ओळख आहे. परंतु, काही समाजविघातक लोकांकडून ...

मलटणमधील गुन्हेगारांचा बंदोबस्त करा
मलटण : फलटणचे एक सुंदर व झपाट्याने विकसित होत असलेले उपनगर म्हणून मलटणची ओळख आहे. परंतु, काही समाजविघातक लोकांकडून ही ओळख बदलली जात आहे. याला कारण म्हणजे मलटण व परिसरात वाढत असलेली गुन्हेगारी व छोट्या-मोठ्या स्वरूपातील गुन्हे, यामुळे गेल्या पाच वर्षांपासून मलटण काहीसे अशांत व असुरक्षित आहे.
उपनगर झपाट्याने वाढत असताना या भागात असणारी झोपडपट्टी व यामधील कथित गुंडगिरी करणाऱ्या लोकांकडून व त्यांच्या कुटुंबीयांकडून मलटणमधील नागरिकांना होणारा त्रास आता सहनशक्तीपलीकडे गेला आहे. मलटण व परिसरातून अनेक छोट्यामोठ्या चोरीच्या घटना घडल्याचे उघड झाले आहे. नागरिकांच्या समक्ष त्यांच्या घरासमोरील वस्तू उचलून नेणे, घरावर दगडफेक करणे, दारू पिऊन धिंगाणा घालणे व दहशत माजवणे या घटना तर रोजची डोकेदुखी ठरली आहे. अनेकवेळा दुचाकी गाड्यांची तोडफोड करणे, गाड्या चोरून नेणे, गाड्या अडवून लूट करणे यासारखे प्रकार घडत असल्याचे नागरिकांनी निवेदनात म्हणले आहे. मलटणमधील सर्व नागरिकांच्या उपस्थितीत उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष नरसिंह निकम, फलटण नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक-निंबाळकर, नगरसेवक अशोक जाधव, राजाभाऊ नागटिळे, शरद सोनवणे, नितीन जगताप, कृष्णात नेवसे, नगरसेवक सचिन अहिवळे व सर्व मलटणकर नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
०४मलटण
गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी मलटणमधील नागरिकांनी मोर्चा काढला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.