वाढीव शुल्क वसूल करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:34 IST2021-03-14T04:34:51+5:302021-03-14T04:34:51+5:30

सातारा : महाविद्यालयांनी जादा घेतलेली फी विद्यार्थ्यांना परत करावी आणि ज्या कारणासाठी विद्यार्थ्यांकडून फी घेतलेली आहे, ती साधने विद्यार्थ्यांना ...

Take action against colleges that charge increased fees | वाढीव शुल्क वसूल करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करा

वाढीव शुल्क वसूल करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करा

सातारा : महाविद्यालयांनी जादा घेतलेली फी विद्यार्थ्यांना परत करावी आणि ज्या कारणासाठी विद्यार्थ्यांकडून फी घेतलेली आहे, ती साधने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जावीत. जी महाविद्यालये हे करणार नाहीत, त्या महाविद्यालयांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी विद्रोही विद्यार्थी संघटनेच्या सातारा जिल्हा शाखेच्या शिष्टमंडळाने सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

याबाबत वाढीव शुल्कच्या विरोधात जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शुल्क वसूल करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करणार असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले होते. विद्यापीठाशी संलग्न स्वायत्त महाविद्यालयांनासुद्धा (जिमखाना, डेव्हलपमेंट शुल्क) अशा शुल्कवाढ आकारता येणार नाही. जर असे निदर्शनास आले तर कडक कारवाई केली जाईल. सध्याच्या काळात केवळ शैक्षणिक शुल्क आकारता येईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले होते. तरी देखील सातारा जिल्ह्यातील जवळपास निम्यापेक्षा जास्त महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून जास्तीची फी वसूल केलेली आहे. अशा महाविद्यालयांवर अजून देखील कारवाई झालेली नाही. अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्याला जबाबदार कोण..? अशा महाविद्यालयांवर कारवाई कधी होणार..? जास्तीची घेतलेली फी विद्यार्थ्यांना परत करावी आणि ज्या कारणासाठी विद्यार्थ्यांकडून फी घेतलेली आहे, ती साधने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जावीत आणि जी महाविद्यालये हे करणार नाहीत त्या महाविद्यालयांवर तातडीने कारवाई करावी, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी विद्रोही विद्यार्थी संघटनेचे संकेत माने-पाटील, शुभम ढाले, रश्मी लोटेकर, रोहित क्षीरसागर, हर्षदा पिंपळे, राहुल आवळे हे उपस्थित होते.

Web Title: Take action against colleges that charge increased fees