तहानलेल्या शेतकऱ्यांचा पालकमंत्र्यांपुढे टाहो!
By Admin | Updated: August 18, 2015 00:50 IST2015-08-18T00:50:43+5:302015-08-18T00:50:43+5:30
खटाव तालुका : होळीचा गाव, गुरसाळे, शिरसवडे, शितोळेवाडी ग्रामस्थांनी मांडली व्यथा

तहानलेल्या शेतकऱ्यांचा पालकमंत्र्यांपुढे टाहो!
सातारा : पावसाने पाठ फिरविल्याने चिंताग्रस्त शेतकऱ्यांना बळ देण्याऐवजी त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा एकसूत्री कार्यक्रम प्रशासनाच्या पातळीवर सुरू आहे. खटाव तालुक्यात उरमोडीचे पाणी गेले असले तरी होळीचा गाव, गुरसाळे, शिरसवडे, शितोळेवाडी या गावांना डावलून पाणी पुढे पळविण्यात आले आहे. यामुळे संतप्त झालेल्या या चार गावांतील शेतकऱ्यांनी पालकमंत्री विजय शिवतारे यांच्यापुढे सोमवारी अक्षरश: टाहो फोडला.
उरमोडी धरणातून खटावकडे नेलेले पाणी शिरसवडे येथील तलावात एकत्र केले जाते. या पाण्यासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून वर्गणीही घेतली आहे. शेतकऱ्यांनी एक लाखाची वर्गणी उरमोडी धरण विभागाला भरली असून, त्याची रितसर पावतीही शेतकऱ्यांकडे आहे. दुष्काळी भागात मोडत असूनही या भागातील शेतकऱ्यांनी हंगामी पिकांसोबत कांदा, बटाटा अशी नगदी पिकेही केली आहेत. शिरसवडे तलावात पाणी नसल्याने जवळपास ५० हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत.
उरमोडी विभागाशी वारंवार संपर्क साधूनही शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने या गावांतील प्रताप जाधव, वसंत देशमुख, मनोज शितोळे यांच्यासह शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी पालकमंत्र्यांची भेट घेतली. चार गावांना डावलून पाणी नेल्याची तक्रार या शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे केली. पाण्याअभावी पिके करपू लागली आहेत. पुढच्या गावांना पाणी नेले असले तरी पाठीमागच्या गावांना पाणी दिले गेले नाही. या गावांची गळचेपी केली जात असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला. त्यावर पिण्याचे पाणी प्रामुख्याने देण्यात येत असल्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी स्पष्टीकरण केले; पण वडूज, उंबर्डे, नायकाचीवाडी या गावांत शेतीसाठीही पाणी दिले जात असून, हा नियम आम्हालाच का लावला आहे?, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला, त्यावर पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केली. (प्रतिनिधी)
लेखी निवेदन नसल्याने
या प्रश्नाचं होणार काय?
लेखी निवेदन दिल्याशिवाय कामे होत नाहीत, ही प्रशासकीय पद्धत दुष्काळ भागातल्या शेतकऱ्यांना माहीत नव्हती, त्यामुळे या शेतकऱ्यांनी पालकमंत्री विजय शिवतारे यांच्याशी तोंडी चर्चा केली. पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाला तशा सूचनाही केल्या; पण आता लेखी निवेदनाशिवाय प्रशासकीय यंत्रणा कितपत हालचाल करतेय, ते या प्रकरणात पाहण्याजोगे ठरणार आहे.