शेतीपंपाचा विद्युत पुरवठा चालू करण्यासाठी शेतकऱ्यांचा टाहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:42 IST2021-08-26T04:42:20+5:302021-08-26T04:42:20+5:30

कुसूर : वांग नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या शेतीपंपांना वीजपुरवठा केलेल्या विद्युत खांबांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, शेतीपंपाचा ...

Tahoe of the farmers to turn on the power supply of the agricultural pump | शेतीपंपाचा विद्युत पुरवठा चालू करण्यासाठी शेतकऱ्यांचा टाहो

शेतीपंपाचा विद्युत पुरवठा चालू करण्यासाठी शेतकऱ्यांचा टाहो

कुसूर : वांग नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या शेतीपंपांना वीजपुरवठा केलेल्या विद्युत खांबांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, शेतीपंपाचा विद्युत पुरवठा आजही खंडित असल्याने पाण्याअभावी पिके धोक्यात आली आहेत. संबंधित विभागाने वीजपुरवठा चालू करण्यासाठी शेतकऱ्यांनी टाहो फोडला आहे. या कामी लोकप्रतिनिधी लक्ष घालणार का, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

पाटण तालुक्यातून कऱ्हाड तालुक्यात प्रवाहित होत असलेल्या वांगनदीला आलेल्या महापुरामुळे शेतीसह विद्युत वितरणचे मोठे नुकसान झाले आहे. शेतीपंपासाठी उच्चदाबाचा पुरवठा करणारे काही खांब वाहून गेले, तर काही मोडून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे. मात्र, अनेक ठिकाणी नदीने प्रवाह बदलल्यामुळे जमीन खचल्याने खांब उभारणीसाठी अडथळे निर्माण होत आहे.

विद्युत साधनांचे नुकसान झालेल्या क्षेत्रात पाटण तालुक्यातील तळमावले आणि कराड तालुक्यातील कोळेवाडी सबस्टेशनला मोठा फटका बसला आहे. कोळेवाडी सबस्टेशनअंतर्गत असलेल्या शेतीपंपासाठी पुरवठा केल्या जाणाऱ्या उच्चदाबाचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे. सुमारे साठहून अधिक खांबांचे नुकसान झाले आहे. मात्र, अनेक ठिकाणी खांब घेऊन जाण्यासाठी अडथळे येत असल्याने, कामाला विलंब होत आहे.

अतिवृष्टीनंतर पावसाने दडी मारल्याने पाण्याअभावी पिके होरपळू लागली आहेत. परिणामी, पिकांना पाणी देणे अत्यावश्यक आहे. मात्र, विद्युत पुरवठा खंडित असल्याने शेतकऱ्यांना शेतीला पाणी देणे अशक्य झाल्याने नवे संकट उभे राहिले आहे. काढणे, तारूख, कुसूर, कोळेवाडी, अंबवडे, कोळे आदी गावांतील शेतकरी विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी मागणी करत आहेत.

चौकट :

कोळेवाडी सबस्टेशनअंतर्गत असलेल्या काही जनमित्रांची अन्य ठिकाणी बदली झाल्याने कामगारांची उणीव भेडसावत आहे. परिणामी, विद्युत खांब आणि वीजवाहिन्यांची अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान दुरुस्ती कामी मनुष्य बळ कमी पडत असल्याने, वरिष्ठांनी याची दखल घेऊन रिक्त जागा भराव्यात.

कोट :

नदीकाठसह गावठाणातील विद्युत खांब आणि वीजवाहिन्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गावठाणातील विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला आहे. शेतीपंपासाठी उच्चदाबाचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे. आठ दिवसांत पुरवठा चालू करण्याचा प्रयत्न चालू आहे. शेतीपंपाची थकीत वीजबिले भरून शेतकऱ्यांनी सहकार्य करावे.

कोळेवाडी शाखा अभियंता - राजेंद्र पवार.

Web Title: Tahoe of the farmers to turn on the power supply of the agricultural pump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.