एअरगनसह तलवारी, सुरे हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:41 IST2021-04-04T04:41:16+5:302021-04-04T04:41:16+5:30
बालाजी सुभाष सोनकांबळे (वय २३, रा. शिवणखेड, ता. अहमदपूर, जि. लातूर, सध्या रा. कार्वे, ता. कऱ्हाड) असे आरोपीचे नाव ...

एअरगनसह तलवारी, सुरे हस्तगत
बालाजी सुभाष सोनकांबळे (वय २३, रा. शिवणखेड, ता. अहमदपूर, जि. लातूर, सध्या रा. कार्वे, ता. कऱ्हाड) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत होणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पोलीस हवालदार सुनील पन्हाळे व पोलीस नाईक संजय जाधव तहसील कार्यालय ते भेदा चौक रस्त्यावर पेट्रोलिंग करीत असताना जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेसमोर एक जण नंबर नसलेल्या दुचाकीवरून जाताना दिसला. हवालदार पन्हाळे व संजय जाधव यांनी त्याला अडवून त्याच्याकडे चौकशी केली. संशय आल्यामुळे पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक सुरा आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कार्वे येथील त्याच्या घराची झडती घेऊन पोलिसांनी दोन तलवारी, दोन सुरे, एक एअरगन तसेच दुचाकी हस्तगत केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता एक दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हवालदार मिलिंद बैले तपास करीत आहेत.