बगाड यात्रेत घुमला ‘चांगभलं’चा जयघोष
By Admin | Updated: April 10, 2015 01:04 IST2015-04-09T23:28:31+5:302015-04-10T01:04:44+5:30
कवठेत भक्तांची मांदियाळी : घुमला चांगभलंचा जयघोष : राजेंद्र पोळ यांना मिळाला बगाड्याचा मान

बगाड यात्रेत घुमला ‘चांगभलं’चा जयघोष
कवठे : कवठे, ता. वाई येथील बगाड यात्रा दि. ९ व १० रोजी साजरी होत असून यात्रेच्या पहिल्या दिवशी गुरुवारी पारंपरिक पद्धतीने बगाड यात्रा उत्साहात साजरी करण्यात आली. गावाच्या शिवारातून निघालेल्या बगाडयात्रेत ‘काशिनाथाच्या नावानं चांगभलं, भैरवनाथाच्या नावानं चांगभलं’चा जयघोष घुमला.
यात्रेच्या आदल्या रात्री वाजता भैरवनाथ मंदिरात बगाडासाठी कौल लावण्यात आला. राजेंद्र पोळ यांना कौल मिळाल्याने यंदाचा बगाड्या होण्याचा मान त्यांना मिळाला. सोनेश्वर ओझर्डे येथे कृष्णा नदीमध्ये विधिवत स्नान करून बगाड्याला पहाटे मुकाई मंदिर विठ्ठलवाडी येथे पोहोचविण्यात आले. ग्रामस्थांनी भैरवनाथ मंदिरासमोरील पटांगणात रात्रभर बगाड गाडा तयार करण्याचे काम पूर्ण करून पहाटे गाडा विठ्ठलवाडी येथे शंकरराव पोळ यांच्या भावकीतील बैलामार्फत पोहोचविण्यात आला.
दुपारी दीड वाजता बगाड रथ कवठे गावाकडे आणण्यास सुरुवात झाली. काशिनाथाचे चांगभले, भैरवनाथाचे चांगभले, या जयघोषात शिवारातून बगाड कवठे गावाकडे मार्गस्थ करण्यात आले. ठरावीक अंतरानंतर बगाडाच्या शिडाच्या पाच प्रदक्षिणा पूर्ण करण्यात येत होत्या. यामुळे अरिष्ट टळते, असे मानले जाते. सायंकाळी सहाच्या दरम्यान बगाड यात्रा कवठे गावात येऊन निर्विघ्न पार पडली. खांद्यावरून बगाड्यास भैरवनाथ मंदिरात नेवून त्याच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.
रात्री छबिन्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात्रेच्या दुसऱ्या दिवशी मनोरंजनासाठी तमाशाचे आयोजन केले आहे. संध्याकाळी कुस्त्यांचा आखाडा होणार असून यामध्ये महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान संतोष पडळकर व धीरज पवार यांची ५१ हजार रुपये व चांदीच्या गदा यावर कुस्ती होणार असून विविध चार लाखांपर्यंत इनामांच्या जंगी फडाचे आयोजन यात्रा कमिटीमार्फत करण्यात आले आहे. (वार्ताहर)
५रथाला सहा बैलजोड्या
कवठे गावामध्ये एकूण अकरा भावक्या असून या अकरा भावकीच्या बैलांना ठरावीक अंतर बगाड ओढण्याचा मान दिला जातो. यास खुता असे म्हणतात. प्रत्येक खुत्यात सहा बैलजोड्या म्हणजेच बारा बैलांनी गाडा ओढला जातो.