स्वीट ‘कॉर्न’ एक नंबर-- ‘लोकमत’संगे जाणून घेऊ
By Admin | Updated: July 23, 2014 22:30 IST2014-07-23T22:22:20+5:302014-07-23T22:30:36+5:30
मका आहे बहुउपयोगी : खाण्याबरोबरच स्टार्च, कॉर्न पीठ, चायनीज, बेकरी प्रॉडक्टमध्ये वाढला वापर

स्वीट ‘कॉर्न’ एक नंबर-- ‘लोकमत’संगे जाणून घेऊ
सातारा - जगात सर्वात जास्त पिकविले जाणारे तिसऱ्या क्रमांकाचे पीक म्हणून मक्याकडे पाहिले जाते. असा हा मका आता सर्वांच्याच जीवनाचा भाग बनत चालला आहे. स्टार्च तयार करण्यासाठी व रोजच्या आहारातील बेकरी प्रॉडक्ट, चायनीज पदार्थ यामध्ये मका इतर पिठांना पर्यायी पीठ म्हणून उपयोगी होऊ लागला आहे.सातारा जिल्ह्यातही मक्याच्या कणिसांची आवक मोठ्या प्रमाणावर होते. जिल्ह्यात दिवसाला लाखांच्या पुढे उलाढाल होते. यात सातारा, कऱ्हाड आणि महाबळेश्वर आघाडीवर आहेत.
मका सर्वात प्रथम मेक्सिकोमध्ये सुमारे सात हजार वर्षांपूर्वी पिकवला गेला. सध्या अमेरिकेला मक्याचे कोठार म्हटले जाते. मध्य अमेरिकेत मक्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. दैनंदिन खाण्यासाठी ताज्या स्वीट कॉर्नचा वापर केला जातो, तर वाळवलेला मका पीठ, लाह्या व इतर पदार्थांसाठी पिकविला जातो. मक्याचे तेल मोठ-मोठ्या कारखान्यांमध्ये वापरले जाते. तसेच मक्यापासून तयार होणारे कॉर्न स्टार्च याचा वापर कापडांमध्ये केला जातो. याचबरोबर कित्येक खाद्य कंपन्यांत, ‘थिकनिंग एजंट’ म्हणेजच सॉस, पुडिंगसारखा प्रकारांमध्ये दाटपणा येण्यासाठी वापरले जाते.
कॉर्न स्टार्च हे सिरप म्हणूनही वापरले जाते. ज्याचा वापर साखरेलाही पर्याय म्हणून गोड पदार्थांमध्ये वापरला जातो. बेबीकॉर्न हे प्रामुख्याने भाज्यांमध्ये, सॅलेडमध्ये वापरले जाते. (प्रतिनिधी)
साताऱ्यातील खास ‘मका’ हॉटेल
येथील सदर बझारमध्ये ‘अनिशन’या नावाने मक्याचे विविध खाद्य पदार्थ विक्री करणारे हॉटेल आहे. मक्याचे पॅटीस, कटलेट, स्वीट कॉर्न बर्गर, सूप, रायता, सामोसा, मका राईस, यासारखे पदार्थ मिळतात. महाविद्यालयातील तरूणाई बरोबरच अनेकजण सहकुटुंब हे खाण्याचा आस्वाद घेतात. यातील उपयुक्त पोषक घटकांमुळे सातारकरांना या हॉटेलने भुरळ घातली आहे.