कृष्णाकाठी वाळू चोरांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:41 IST2021-02-09T04:41:04+5:302021-02-09T04:41:04+5:30
न्यायालयाने स्थगिती दिल्याने यावर्षी वाळूचे लिलाव झालेले नाहीत. त्यामुळे बांधकामांना वाळूची कमतरता भासत आहे. सॅण्ड क्रश वापराद्वारे वाळूची कमतरता ...

कृष्णाकाठी वाळू चोरांचा धुमाकूळ
न्यायालयाने स्थगिती दिल्याने यावर्षी वाळूचे लिलाव झालेले नाहीत. त्यामुळे बांधकामांना वाळूची कमतरता भासत आहे. सॅण्ड क्रश वापराद्वारे वाळूची कमतरता भरून काढता येते. मात्र, या क्रशच्या उपलब्धतेसाठी प्रशासनाकडून प्रयत्न झाले पाहिजेत. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने कृष्णा नदीसह प्रमुख नद्यांच्या पात्रात मोठ्या प्रमाणात वाळू उपलब्ध आहे. सध्या ९ ते ११ हजार रुपये ब्रासप्रमाणे वाळूची विक्री होत आहे. त्यामुळे काही वाळू व्यावसायिकांनी पूर्वीच्या ठिय्यांतूनच चोरून वाळू उपशाचा उद्योग सुरू केला आहे. प्रीतीसंगम परिसरात तर दुचाकीसह लहान वाहनातून चोरटी वाळू वाहतूक सुरू आहे. त्यामुळे दिवंगत यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळाच्या शेजारीच संरक्षक भिंतीला धोका निर्माण झाला आहे.
चार दिवसांपूर्वी रात्री वाळू चोरांनी याठिकाणी कहरच केला असून संगमेश्वर मंदिरापासून नदीपात्राकडे जाण्याच्या रस्त्यावरच धोकादायक खड्डे पाडले आहेत. नदीपात्रात पोहोयला जाणाऱ्यांसह नदीपात्राकडे जाणाऱ्या नागरिकांच्या जिवाला या खड्ड्यांमुळे धोका निर्माण झाला आहे. तसेच स्मृतिस्थळ आणि नजीकच संरक्षक भिंत यालाही या खड्ड्यांची झळ बसू शकते. त्यामुळे प्रशासनाने वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.
- चौकट
भिंतीच्या दगडांसह जाळी रिकामी
वाळू चोरांनी आपला मोर्चा सध्या संगमेश्वर मंदिराकडे वळविला आहे. या मंदिराजवळच त्यांनी वाळू उपसा करून मोठे खड्डे पाडले आहेत. चार दिवसांपूर्वी मध्यरात्रीनंतर झालेल्या वाळू चोरीत मोठे खड्डे पडले असून, संरक्षक भिंतीचे दगड व जाळी उघडी पडली आहे.
- चौकट
महसूल यंत्रणा सुस्त
अवैध वाळू उपशावर अंकुश ठेवण्यासाठी काही दिवसांपासून प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. मात्र प्रीतीसंगमावरच दररोज रात्री वाळू चोरी होत असल्यामुळे आता ती यंत्रणा सुस्त झाली का? असा सवाल उपस्थित होत आहे. महसूल विभागाने रात्री गस्त घालून अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करणे गरजेचे आहे.
- चौकट
चर नावाला... रस्ता दोन्ही बाजूला
प्रीतीसंगम परिसरात वाळू चोरांना अटकाव करण्यासाठी नदीकडे जाणाऱ्या रस्त्याला जेसीबीने चर खोदण्यात आली आहे. मात्र त्याच चरीच्या दोन्ही बाजूने रस्ते तयार करून ट्रॅक्टरसह लहान लहान वाहनाद्वारे वाळूचोरी सुरूच आहे.
फोटो : ०८केआरडी०२
कॅप्शन : कऱ्हाडात प्रीतीसंगमनजीक कृष्णा नदीकाठावरून वाळूचा उपसा करण्यात आला असून, मोठमोठे खड्डे पाडण्यात आले आहेत. (छाया : माणिक डोंगरे)