मावळ्यांच्या त्यागातून स्वराज्य निर्माण झाले

By Admin | Updated: April 21, 2015 01:00 IST2015-04-21T00:37:41+5:302015-04-21T01:00:28+5:30

शिवचरित्रकार रोहिदास हांडे : लक्ष्मणराव भरगुडे-पाटील व्याख्यानमाला

Swarajya created from the revolt of Mavalya | मावळ्यांच्या त्यागातून स्वराज्य निर्माण झाले

मावळ्यांच्या त्यागातून स्वराज्य निर्माण झाले

खंडाळा : ‘राष्ट्रीय एकता, राष्ट्रीय आदर्श आणि राष्ट्रीय शौर्य यांचा त्रिवेणी संगम शिवशाहीत होता. कोणत्याही मोहिमेचे योग्य नियोजन आणि काटेकोर अंमलबजावणी या बळावर शिवरायांनी यश मिळविले. मावळ्यांच्या त्यागातून हिंदवी स्वराज्य निर्माण झाले. त्यागी जीवनाचा अंगीकार केल्याखेरीज पुन्हा सुराज्य घडणार नाही, त्यासाठीच आजच्या समाजाला शिवरायांच्या विचारांची गरज आहे म्हणूनच राष्ट्र निर्माणासाठी तरुणांनी पुढे यावे,’ असे आवाहन शिवचरित्रकार रोहिदास हांडे यांनी केले.
पळशी, ता. खंडाळा येथे दिवंगत लक्ष्मणराव भरगुडे-पाटील स्मृती व्याख्यानमालेत ‘शिवरायांचे मावळे’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, मिलिंद देशपांडे, लक्ष्मण वीर, सरपंच मनीषा भरगुडे, उपसरपंच सीताबाई भरगुडे, व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष अशोक भरगुडे, सदस्या उज्ज्वला चव्हाण, सुनीता भरगुडे आदी प्रमुख उपस्थित होते. हांडे म्हणाले, ‘पळशी गावाला सांस्कृतिक वारसा आहे. एकीच्या बळावर समृद्ध खेडी पाहायचे असेल तर पळशीचा आदर्श घ्यावा लागेल. मॉरिसेस दौऱ्यावरही पळशी गावच्या कामाचा प्रसार करणार आहोत. गाव आणि राष्ट्र निर्माण करण्यासाठी संस्कृतीची जोपासना गरजेची आहे. बलशाली भारत घडविण्यासठी प्रत्येकाने सहानुभूतीने जगण्यापेक्षा स्वाभिमानाने मरण आले तरी ते स्वीकारले पाहिजे.’
नितीन भरगुडे-पाटील म्हणाले, ‘जीवनात प्रत्येकाला आई-वडील समजले पाहिजेत. ज्यांच्यामुळे आपले जीवन आहे. त्यांच्या स्मृती जागृत ठेवण्याचे काम पळशी ग्रामस्थांनी केले आहे. व्याख्यानमालेतून विचारधारा घराघरात पोहोचली म्हणूनच गावची एकी अबाधित राहिली आहे.’
यावेळी माजी सभापती दिवंगत लक्ष्मणराव भरगुडे-पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
अशोक भरगुडे यांनी स्वागत केले. रमेश भरगुडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Swarajya created from the revolt of Mavalya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.