उंब्रजमध्ये स्वाभिमानीने राज्य मार्ग रोखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:38 IST2021-03-20T04:38:49+5:302021-03-20T04:38:49+5:30
उंब्रज : वीज बिले माफ करून सुरू असलेली सक्तीची वसुली तत्काळ थांबवावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ...

उंब्रजमध्ये स्वाभिमानीने राज्य मार्ग रोखला
उंब्रज : वीज बिले माफ करून सुरू असलेली सक्तीची वसुली तत्काळ थांबवावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी उंब्रज येथे महावितरणच्या कार्यालयाबाहेर राज्य मार्ग रोखला. विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन उंब्रज परिसरातील ग्राहकांशी अरेरावी करू नये, अशी समज दिली. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत शेतकरी व नागरिकांची वीज बिले आघाडी सरकारने तत्काळ माफ करावीत, अशी मागणी केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी सकाळी उंब्रज येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केली. त्यानंतर वीज वितरण विरोधात घोषणाबाजी देत आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब यादव, देवानंद पाटील, प्रमोद जगदाळे, विक्रमसिंह कदम, इंद्रजीत जाधव, सुरेश पाटील, वसंत पाटील, शरद जाधव, महेश जाधव, दत्ता थोरात, अभिजित जाधव दिग्विजय कदम व शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून आंदोलनकर्त्यांनी मोर्चास सुरुवात केली. चौकातून वीज वितरण कार्यालयापर्यंत आंदोलकांनी घोषणाबाजी करत पाटण पंढरपूर राज्य मार्ग काहीकाळ रोखला. दरम्यान आंदोलकांनी वीज वितरणचे अभियंता कुंभार यांना निवेदन दिले. वीज बिल माफ करून सक्तीची वसुली थांबवावी, ज्यांची वीज कपात केली आहे ती त्वरित जोडून द्यावीत, वीजबिलात संपूर्ण माफी मिळावी, लाॅकडाऊन कालावधीत दिलेली अंदाजे वीज बिले मागे घ्यावीत, अशी मागणी केली.
यावेळी दादासाहेब यादव म्हणाले, गेल्या सात ते आठ महिन्यांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह महाराष्ट्रातील जनतेने वीज बिल माफीसाठी सातत्याने लोकशाही मार्गाने आंदोलने केली आहेत. लोकांना वीज बिले दिली गेली नाहीत तसेच ऊर्जामंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी वीज बिलात सवलत देण्याबाबत सूतोवाच केले. परंतु सरकारने पलटी मारून सक्तीची वसुली सुरू केली आहे. वीज कनेक्शन तोडणे चालू केले आहे.
देवानंद पाटील म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वतीने संपूर्ण महाराष्ट्रात वीज वितरण कंपनीच्या अन्याय कारक वीज बिल वसुलीच्या विरोधात निषेध आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात वादळ, पाऊस, गारपीट, पूरपरिस्थिती, पिकांवर येणारी रोगराई व कीड, आणि त्यातून मिळणारा हमीभाव याचा मेळ घालताना सर्व सामान्य शेतकरी हवालदिल झालेला आहे. कोरोना या रोगाचे जागतिक संकट आले. त्या संकटाचा सामना करताना त्यातून शेतकरी राजा सुटला नाही. त्याचा भाजीपाला व इतर माल कवडी मोलाने विकावा लागला. त्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. काळ्या आईची सेवा करत कष्ट करीत राहिला या शेतकऱ्याने स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा शेतकऱ्यांची शेतीपंपाची वीज बिल माफ करावे, अशी मागणी केलेली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उंब्रज बाजारपेठ व महावितरण कार्यालय परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
फोटोः
उंब्रज ता. कराड येथे महावितरणच्या कार्यालयासमोर राज्यमार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला.