जिल्हा बँक नोकरभरतीला स्थगिती
By Admin | Updated: June 15, 2017 23:02 IST2017-06-15T23:02:17+5:302017-06-15T23:02:17+5:30
जिल्हा बँक नोकरभरतीला स्थगिती

जिल्हा बँक नोकरभरतीला स्थगिती
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्हा सहकारी बँकेतील नोकरभरतीच्या प्रवेश परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाही उत्तीर्ण दाखविल्याची तक्रार दाखल होताच सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी या संपूर्ण प्रक्रियेलाच स्थगिती देण्याबाबत सहकार आयुक्तांना आदेश दिले आहेत.
याप्रकरणी सातारा जिल्हा बँकेच्या नोकरभरतीत घोटाळा झाल्याची याचिका माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी उच्च न्यायालयात केली होती. मात्र, ही याचिका फेटाळल्यानंतर याच तालुक्यातील भाजपचे जिल्हा परिषदेचे सदस्य आणि जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई यांनी नोकरभरती प्रकरणात अनुत्तीर्ण उमेदवारांना उत्तीर्णांच्या यादीत समाविष्ट केल्याची तक्रार सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे केली. दाखल केलेल्या या तक्रार अर्जावर गुरुवारी सहकारमंत्र्यांनीही तातडीने शेरा मारून या नोकरभरती प्रक्रियेला तत्काळ स्थगिती देऊन कार्यवाही करण्याचे आदेश सहकार आयुक्तांना दिले आहेत.दरम्यान, ‘जिल्हा बँकेच्या भरती घोटाळाप्रकरणी आपण पूर्वीपासूनच आवाज उठविल्यामुळे शासनाला माझ्या भूमिकेची दखल घ्यावी लागली,’ असा दावा काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी केला, तर सहकारमंत्र्यांना आपण समक्ष भेटून या घोटाळ्याचे गांभीर्य स्पष्ट केल्यामुळेच हा निर्णय झाल्याची माहिती भाजपचे अनिल देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
१७ उमेदवार बोगस !
लिपिक पदासाठी ११ उमेदवारांनी परीक्षा दिली नसतानाही या उमेदवारांची अंतिम यादीत नावे जाहीर करण्यात आली आहेत.
शिपाई पदाच्या जागेसाठीही हीच परिस्थिती असून, सहा उमेदवारांना गैरव्यवहाराने उत्तीर्ण केल्याचा आरोपही अनिल देसाई यांनी केला.