कामचुकार ग्रामसेवकांना निलंबित करा
By Admin | Updated: May 12, 2015 23:43 IST2015-05-12T23:17:38+5:302015-05-12T23:43:58+5:30
रेश्माक्का होर्तीकर : जत तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षकांची दोनशे पदे रिक्त

कामचुकार ग्रामसेवकांना निलंबित करा
सांगली : जत तालुक्यातील ग्रामसेवक ग्रामपंचायतींमध्ये उपस्थित नसल्यामुळे ग्रामस्थांची कामे खोळंबली आहेत. जे ग्रामसेवक आठवड्यातून दोन ते तीन दिवसही कार्यालयात येत नसतील, त्यांच्यावर अधिकाऱ्यांनी तातडीने निलंबनाची कारवाई करून त्यांना घरी पाठवा, असा सूचना जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांनी मंगळवारी दिल्या. जत तालुक्यात वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी आदींची दोनशे पदे रिक्त आहेत. ती पदे भरण्यासाठी शासनाकडे प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जत तालुक्यातील प्रश्नांवर जिल्हा परिषदेमध्ये अधिकारी, जिल्हा परिषद सदस्यांची होर्तीकर यांनी बैठक घेतली. या बैठकीनंतर त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, जत तालुका भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा आहे. येथील अनेक ग्रामपंचायतींमधील ग्रामसेवक आठवड्यातून तीन दिवसही कार्यालयात उपस्थित नसल्याचे भेटीवेळी दिसून आले आहे.
ग्रामसेवक नसल्यामुळे गावातील सर्व कामकाज ठप्प होत आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतींना भेटी देऊन तेथील कामचुकार ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करून त्यांना घरी पाठवावे. जत तालुक्यातील शिक्षक, मुख्याध्यापकांची १६६ पदे आणि ग्रामसेवक, पशुवैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांची जवळपास ४० पदे रिक्त आहेत. यामुळे येथील विकास कामांवर परिणाम झाला आहे. जिल्हा परिषद स्तरावरील पदे त्वरित भरण्यात येणार आहेत. उर्वरित रिक्त पदे भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.
या बैठकीस उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, सदस्या रूपाली पाटील, मीनाक्षी अक्की, सुनंदा पाटील, संजीवकुमार सावंत यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सीडीपीओची पदे रिक्त
जिल्ह्यात महिला-बालकल्याण विभागाचे १३ प्रकल्प असून, तेथे तेवढेच अधिकारी कार्यरत असण्याची गरज आहे. पंरतु, प्रत्यक्षात १३ बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या पदापैकी सध्या केवळ एकच कार्यरत आहे. तेही येत्या ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणार असून, सर्वच पदे रिक्त होणार आहेत. यामुळे महिला व बालकल्याण विभागाचे कामकाज ठप्प होणार आहे. यासंबंधी पाठपुरावा करणार आहे, असेही होर्तीकर यांनी सांगितले.
शिक्षकांना गणवेश सक्ती
जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढविण्याच्यादृष्टीने अनेक बदल केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून प्रत्येक शिक्षकांना येत्या शैक्षणिक वर्षापासून गणवेशाची सक्ती करण्यात येणार आहे. या निर्णयास शिक्षक संघटनांनीही प्रतिसाद दिला आहे. यावर्षी प्रत्येक तालुक्याचा गणवेश स्वतंत्र असणार आहे. परंतु, पुढील दोन वर्षात जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचा एकच गणवेश ठेवण्यात येणार आहे, असेही होर्तीकर यांनी सांगितले.
४शाळेत पहिल्याचदिवशी मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने नियोजन केले असून, पुस्तके पंचायत समितीच्या ठिकाणी पोहोच झाली आहेत. गणवेशही उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.