सूर्यनारायणाच्या साक्षीनं ‘मॉर्निंग वॉक’

By Admin | Updated: August 11, 2015 00:03 IST2015-08-11T00:03:28+5:302015-08-11T00:03:28+5:30

अफवा बंद; पण भीती कायम : अंधारात बाहेर पडण्यास घाबरतायत नागरिक--फेकूगिरीची ‘सोशल’ कथा

Suryanarayana's 'Morning Walk' | सूर्यनारायणाच्या साक्षीनं ‘मॉर्निंग वॉक’

सूर्यनारायणाच्या साक्षीनं ‘मॉर्निंग वॉक’

माणिक डोंगरे -मलकापूर  चोरट्यांच्या अफवेने गत महिना ढवळून निघाला. सध्या अफवा बंद झाल्या असल्या तरी चोरट्यांची भीती मात्र कायम आहे. आजही गावाला येणारा पाहुणा किंवा आडरानातील व्यावसायिक नऊच्या आत घरात येत आहेत. शहरात मॉर्निंग वॉकला बाहेर पडणारे भीतीपोटी सूर्यनारायणाच्या साक्षीनेच बाहेर पडत आहेत.
जुन-जुलै महिन्यांत कऱ्हाड तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये चोरटे दिसल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या. कापील, काले, धोंडेवाडी, नांदलापूर, आटके यासह परिसरातील विविध गावांमध्ये घरांवर दगड पडण्याचे प्रकारही घडले. रानात काम करण्यासाठी गेलेल्या मजुरांना उसात चोरटे दिसल्याचे सांगितले गेले; रात्र गस्त वाढल्या. दिवसा काम व रात्री जागरण करून नागरिक हैराण झाले होते. पाचवड फट्यानजीक चार फिरस्त्यांना चोर समजून युवकांनी बेदम चोप दिला होता. तर रात्रीच्या वेळी आलेल्या पाहुण्यांनाही चोर समजून प्रसाद देण्यात आला.
या घटनांमध्ये किती प्रमाणात सत्यता आहे. किती प्रमाणात अफवा आहेत, हे आजतागायत कोणालाही उमगलेले नाही. पाचवड फाटा, धोंडेवाडी फाटा, आटके टप्पा अशा महामार्ग व राज्य मार्गालगतच्या; पण आडरानातील व्यावसायिकांनी तर आठ वाजताच दुकाने बंद करून घर गाठणे सुरू केले आहे. त्याचबरोबर पाहुणा नऊच्या आत घरात पोहोचू लागला आहे. सूर्यनारायणाच्या साक्षीनेच उजाडल्यानंतरच मॉर्निंग वॉकला जाणे पसंत करत आहेत.

फिरस्त्या विक्रेत्यांना ओळखपत्रे द्यावीत
सातारा : चोरीच्या अफवांच्या पार्श्वभूमीवर फिरस्त्या विक्रेत्यांना व्यवसाय करणे कठीण झाले असून, त्यांची उपासमार टाळण्यासाठी पोलिसांनी त्यांना ओळखपत्रे किंवा शिफारसपत्रे द्यावीत, अशी मागणी करणारे निवेदन ‘सिटू’शी संलग्न असलेल्या जिल्हा जनरल वर्कर्स युनियनच्या वतीने पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना सोमवारी देण्यात आले.
संबंधित विक्रेत्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय ‘सिटू’ने घेतला असल्याचेही वृत्तात म्हटले होते. ‘सिटू’चे जिल्हाध्यक्ष वसंत नलावडे, कोषाध्यक्ष सलीम आतार आणि फिरस्त्यांच्या प्रतिनिधींनी मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षकांना दिले. संघटनेने प्रत्यक्ष वस्तीत जाऊन खातरजमा केली असून, फिरस्त्यांशी लोक संशयाने वागत असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच खालावली आहे. पोलिसांनी लक्ष घालून फिरत्या विक्रेत्यांना ओळखपत्रे किंवा त्यांचे फोटो असलेले पत्र द्यावे, तसेच त्यांच्या अडवणुकीविषयी कार्यवाही करावी, असे पत्रात म्हटले आहे.

मजुरांचा तुटवडा
कापील-गोळेश्वर, जखिणवाडी, मलकापूर, काले या शहरालगतच्या गावांतील शेतकरी ऊस उत्पादनाऐवजी पालेभाज्या व फळभाज्यांची पिके घेण्याकडे वळला आहे. या पिकांचे संगोपन व काढणी वेळेत होणे गरजेचे असते. चोरट्यांच्या अफवेमुळे महिला मजूर न मिळाल्याने सध्या अनेक कामे लांबणीवर पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचेही आर्थिक नुकसान झाले आहे.


मजुरांचा तुटवडा
कापील-गोळेश्वर, जखिणवाडी, मलकापूर, काले या शहरालगतच्या गावांतील शेतकरी ऊस उत्पादनाऐवजी पालेभाज्या व फळभाज्यांची पिके घेण्याकडे वळला आहे. या पिकांचे संगोपन व काढणी वेळेत होणे गरजेचे असते. चोरट्यांच्या अफवेमुळे महिला मजूर न मिळाल्याने सध्या अनेक कामे लांबणीवर पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचेही आर्थिक नुकसान झाले आहे.

Web Title: Suryanarayana's 'Morning Walk'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.