घागरभर पाण्यासाठी विहिरीत बुडताना मायलेकाला वाचवले
By Admin | Updated: March 4, 2016 00:57 IST2016-03-03T22:49:23+5:302016-03-04T00:57:49+5:30
पिंंपरी येथील घटना : मुलाला वाचविण्यासाठी आईनेही घेतली उडी

घागरभर पाण्यासाठी विहिरीत बुडताना मायलेकाला वाचवले
कोरेगाव : कण्हेर प्रकल्पामुळे पुनर्वसित झालेल्या पिंंपरी, ता. कोरेगाव येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जटील बनला आहे. घागरभर पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण सुरु असताना गुरुवारी सकाळी विहिरीतून पाणी आणताना दहा वर्षांचा मुलगा पडला. त्याला वाचविण्यासाठी आईने उडी टाकली आणि विहिरीच्या कठड्यावर बसलेली मुलगी ओरडल्याने आजूबाजूच्या लोकांनी बुडणाऱ्या मायलेकाला वाचविले.
याबाबत अधिक माहिती अशी, की कण्हेर प्रकल्पामुळे बाधित झालेल्या पिंंपरी गावाचे रहिमतपूरपासून काही अंतरावर पुनर्वसन झाले आहे. ग्रामस्थांना येथे स्वतंत्र गावठाण अद्याप मंजूर झालेले नाही. आमदारांपासून मंत्रालयापर्यंत अनेकदा हेलपाटे मारुनही प्रशासकीय विभागांचे नाहरकतीचे दाखले गोळा करण्यात ग्रामस्थांची दमछाक झाली आहे. नगररचना विभागाच्या ना हरकतीसाठी ग्रामस्थ वाट पाहत आहेत.
गेल्या २० वर्षांपासून ग्रामस्थांशी फरफट सुरु असताना घागरभर पाण्यासाठी गुरुवारी संध्या अर्जुन मर्ढेकर या दहा वर्षांचा मुलगा व सहा वर्षाच्या मुलीसह शेतातील एका विहिरीवर सकाळी गेल्या
होत्या.
अचानक मुलाचा तोल गेल्याने तो विहिरीत पडला, त्याला वाचविण्यासाठी आईने विहिरीत उडी टाकली. दोघे बुडणार एवढ्यात विहिरीच्या कठड्यावर बसलेली मुलगी ओरडल्याने आजूबाजूच्या लोकांनी विहिरीकडे धाव घेतली. महादेव फडतरे या तरुणाने प्रसंगावधान राखत विहिरीत उडी टाकून मायलेकाला वाचवले. गावात घटनेची माहिती समजताच ग्रामस्थ गोळा झाले. (प्रतिनिधी)
आमच्या मरणयातना संपणार कधी...
महाराष्ट्राच्या विकासामध्ये मैलाचा दगड ठरलेल्या कण्हेर प्रकल्पामुळे आम्हाला विस्थापित व्हावे लागले. या प्रकल्पाचा लाभ अनेकजण घेत असतील, पण त्यासाठी आमच्या झालेल्या अन्यायाबाबत कुणीच काही बोलत नाही. प्रशासनाने आमचा कसलाही विचार न करता रहिमतपूरजवळ माळावर पुनर्वसन केले. पुनर्वसन म्हणजे केवळ त्या ठिकाणी पाठविले. त्याठिकाणी आम्हाला धड निवारा दिलेला नाही. आमच्या गावठाणाचा प्रश्न शासनदरबारी अद्याप प्रलंबित आहे. आज आमच्या मायलेकांचा केवळ नशीब बलवत्तर म्हणून जीव वाचला, अन्यथा पाण्यासाठी आमच्यातील दोघे गमावले असते. प्रशासनाने आता तरी आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे आणि आमच्या मरणयातना कधी संपतील, हे एकदाचे सांगावे, अशी संतप्त भावना मारुती मर्ढेकर यांनी व्यक्त केली.