सत्तेत नसल्याची खंत नाही : सुप्रिया सुळे
By Admin | Updated: February 7, 2015 00:12 IST2015-02-06T22:49:24+5:302015-02-07T00:12:19+5:30
एसीबी चौकशी सुरू केली आहे. त्यांनी कोणाचीही चौकशी करावी. सत्य बाहेर येईलच,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सत्तेत नसल्याची खंत नाही : सुप्रिया सुळे
कऱ्हाड : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी एका वेगळ्या विचारावर निर्माण झाला आहे. त्याची पोहोचपावती म्हणूनच गेली पंधरा वर्षें राष्ट्रवादी राज्यात सत्तेत होता. त्या सत्तेतून लोकांसाठीच कामे करण्यात आली. आज राज्यात आणि केंद्रात विरोधात बसावे लागत असले तरी त्याची खंत नाही. आमची लोकाभिमुख कामे सुरूच आहेत,’ असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे केंद्र असलेल्या दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या विरंगुळा या निवासस्थानी त्यांनी आज (शक्रवारी) भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बाळासाहेब पाटील, मोहन डकरे, सादिक इनामदार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. सुळे म्हणाल्या, ‘गतवेळी रेल्वे अर्थसंकल्पात राज्याच्या पदरात फार काही पडले नाही. यंदा मात्र रेल्वेमंत्री राज्याचे असल्याने चांगले काहीतरी वाट्याला येईल, असे वाटत आहे. महाराष्ट्रातील रेल्वे प्रश्नाबाबत आम्ही केंद्राकडे पाठपुरावाही केला आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस सध्या विरोधी पक्षात असून, पक्षबांधणीकडे अधिक लक्ष देता येत आहे. सत्ता असली की अनेकजण गर्दी करतात. आता विरोधी पक्षात असल्याने जनतेत मिसळून कार्यकर्त्यांची मते ऐकण्यास वेळ मिळतोय. म्हणून पक्ष वाढविण्यासाठी यापुढे प्रयत्न करणार आहे. पुण्यात लवकरच राष्ट्रवादीचा भव्य मेळावा घेणार असून, पक्षबांधणी व पुढील पाच वर्षांतील ध्येय धोरणे याबाबत चर्चा होणार आहे. भाजपच्या नेत्यांनी निवडणुकीदरम्यान अनेक आश्वासने दिली. त्यानुसारच एसीबी चौकशी सुरू केली आहे. त्यांनी कोणाचीही चौकशी करावी. सत्य बाहेर येईलच,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीतील काही नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे, असे म्हणताच त्यावर अशा चर्चा होत राहतात. त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असे सुळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
त्यांना वर्ष तरी वेळ द्यायला पाहिजे
राज्यातल्या युती सरकारला शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. याबाबत तुमच्या प्रतिक्रिया काय, असे सुळे यांना छेडले असता, ‘शंभर दिवसांच्या कामावरून शासनाच्या कामगिरीचे मूल्यमापन करणे योग्य ठरणार नाही. त्यासाठी शासनाला किमान वर्षाचा तरी वेळ दिला पाहिजे,’ असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.