पोलिसांच्या निर्भय पथकाला साथ द्या
By Admin | Updated: August 16, 2016 23:00 IST2016-08-16T22:40:46+5:302016-08-16T23:00:21+5:30
उर्मिला मातोंडकर : पन्नास महिलांचं निर्भया पथक झालं कार्यरत; सातारकरांमधून पथकाचं उत्स्फूर्त स्वागत

पोलिसांच्या निर्भय पथकाला साथ द्या
सातारा: ‘कोणत्याही योजनेच यश हे नागरिकांच्या योगदानावर असते. महिलांची असुरक्षितता हा गंभीर प्रश्न असून, त्यासाठी निर्भया पथकाच्या माध्यमातून पोलिसांनी फार मोठे पाऊल उचलले आहे. पोलिसांना प्रत्येक नागरिकाने तसेच महिलांनी साथ द्यावी,’ असे आवाहन प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी केले.
सातारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने आयोजित निर्भया पथकाचे उद्घाटन पोलिस करमणूक केंद्रात झाले. यावेळी त्या बोलत होत्या. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, माणदेशी फाउंडेशनच्या डॉ. चेतना सिन्हा, चित्रलेखा माने-कदम, वैशाली चव्हाण, प्रियांका पाटील आदी उपस्थित होत्या.
उर्मिला मातोंडकर म्हणाल्या, ‘कर्तृत्व, विचार आणि आयुष्यात काही करायचे भान असणे आवश्यक आहे. निर्भया पथक सुरू होत आहे. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. स्त्रिया खूप काही करू शकतात. आपण महाराष्ट्रात जन्माला आलो हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात खूप कमी भेदभाव आहे. स्त्रियांना अनेक संधी आहेत. ग्रामीण भागात छेडछाड झालेल्या मुली तक्रार देण्यास घाबरतात. त्यांना निर्भया पथक आधारस्तंभ ठरणार आहे.
प्रत्येक योजनेचे यश हे नागरिकांच्या प्रतिसादावर अवलंबून असते. त्यामुळे आता प्रत्येक महिलेवर मोठी जबाबदारी असून, पोलिसांनी आपल्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे त्याला सर्व महिलांना साथ द्यावी.’
नागरिकांनीही एक पाऊल पुढे टाकणे आवश्यक आहे. आपण काय करू शकतो ते केले पाहिजे. सबला नसणाऱ्या महिलांमध्ये जागृती केली पाहिजे, त्यांना जाणीव करून दिली पाहिजे. माझे पाचगणीत घर असल्याने एक प्रकारे मीही सातारावासीयच आहे. संपूर्ण जग फिरल्यानंतर साताऱ्याला येण्याची संधी या कार्यक्रमामुळे मिळाली.
जिल्हाधिकारी अश्विन मुदगल म्हणाले, ‘निर्भया पथक म्हणजे प्रतिबंधात्मक पोलिसिंगच्या दृष्टीने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. समाजात विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. अत्याचाराची घटनाच घडू नये यासाठी या पथकाचे मोठे योगदान राहणार आहे.’
पोलिस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, ‘या पथकाच्या कामकाजाची माहिती देत सायबर सेल सुरू झाल्याने आता सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या गुन्हेगारीलाही आळा बसणार आहे. प्रत्येक गावात महिला सुरक्षा समिती, विद्यालय, महाविद्यालयात विद्यार्थिनी सुरक्षा समिती तसेच तक्रार पेटी ठेवण्यात येणार आहे. त्या माध्यमातून येणाऱ्या तक्रारींची दखल पोलिस विभागामार्फत घेतली जाणार असून, दोषींवर कारवाई केली जाणार आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, पोलिस हवालदार अनिल पवार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमानंतर शहरातून निर्भया रॅलीही काढण्यात आली. (प्रतिनिधी)
महिलांना निर्भय बनविणे सर्वांची जबाबदारी
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील म्हणाले, ‘महिलेला आदराचे स्थान आहे परंतु आताच्या काळात तिला निर्भय बनवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. ज्यावेळेस समाजात पोलिस नसताना महिलेला सुरक्षित वाटेल, छेडछाड करणाऱ्यांना वचक बसणारे वातावरण तयार होईल त्यावेळेस हा प्रकल्प यशस्वी झाला असे म्हणता येईल.’