सुनेत्रा शिंदेंचे बंड मागे!
By Admin | Updated: April 28, 2015 23:44 IST2015-04-28T23:33:17+5:302015-04-28T23:44:42+5:30
शशिकांत शिंदेंची मध्यस्थी : सुरेखा पाटील, कांचन साळुंखेंचा मार्ग मोकळा

सुनेत्रा शिंदेंचे बंड मागे!
सातारा : आमदार शशिकांत शिंदे यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सुनेत्रा शिंदे यांनी आपले बंड मागे घेतले. तसेच राष्ट्रवादीच्या पॅनेलला जाहीर पाठिंबा देत असल्याचे लेखी पत्रही त्यांनी मंगळवारी आ. शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले. त्यांच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादीच्या सुरेखा पाटील व कांचन शिंदे या दोघींची जिल्हा बँकेत जाण्याची वाट मोकळी झाली आहे.
जिल्हा बँक निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने कोरेगावच्या सुरेखा पाटील व सातारा तालुक्यातील कांचन साळुंखे या दोघींना महिला राखीव मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघासाठी ३० उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी २७ जणींनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. मात्र, राष्ट्रवादीच्या सुनेत्रा शिंदे यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिला.
दरम्यान, मंगळवारी सकाळी आ. शशिकांत शिंदे बँकेत आले होते. तेव्हा सुनेत्रा शिंदे व त्यांचे चिरंजीव सौरभ शिंदे यांनी आमदारांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र दिले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंंबाळकर, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखालील शेतकरी पॅनेलच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिल्याचे त्यांनी जाहीर केले. (प्रतिनिधी)
बाळासाहेब, लालासाहेबांशीही बोलणी यशस्वी : शिंदे
सगळे शिंदे आता एकत्र आले आहेत. इथून पुढच्या कालावधीत सर्व सार्वत्रिक निवडणुका सुनेत्रा शिंदे, सौरभ शिंदे व मी स्वत: एकत्रित लढणार आहोत. तसेच येत्या दोन दिवसांत आ. बाळासाहेब पाटील व कोरेगावचे लालासाहेब शिंदे यांची नाराजीही आपण दूर करू, असा विश्वास आमदार शशिकांत शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
मी खरे तर २४ एप्रिलला वेळ संपल्याने अर्ज मागे घेऊ शकले नव्हते. आमदार शशिकांत शिंदे यांना भेटूनच उमेदवारी मागे घेऊन राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय मी घेतला होता, त्यानुसार मंगळवारी पाठिंब्याचे पत्र दिले आहे. - सुनेत्रा शिंदे