श्वानालाही जगण्याचा अधिकार भावनेतून सुनेत्रा भद्रेंचा लढा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:25 IST2021-06-20T04:25:44+5:302021-06-20T04:25:44+5:30
विकास नावाच्या संकल्पनेने सर्व झपाटलेले आहेत. विकास म्हणजे काय तर सिमेंटची जंगलं वाढविणे, ही जंगलं वाढविण्यासाठी आपण हिरवीगार जंगलं ...

श्वानालाही जगण्याचा अधिकार भावनेतून सुनेत्रा भद्रेंचा लढा...
विकास नावाच्या संकल्पनेने सर्व झपाटलेले आहेत. विकास म्हणजे काय तर सिमेंटची जंगलं वाढविणे, ही जंगलं वाढविण्यासाठी आपण हिरवीगार जंगलं उद्ध्वस्त करत आहोत. या कृतीमुळे होणाऱ्या पर्यावरणीय समस्यांचे पुरेसे गांभीर्य राहत नाही. हे कमी म्हणून की काय प्राण्यांविषयी, त्यातही शहरात फिरणाऱ्या भटके श्वान-मांजरांविषयीही कमालीची असंवेदनशीलता पाहायला मिळते. असे असले तरी प्राण्यांच्या संदर्भात क्रूरता, छळ प्रतिबंधक कायदा १९६० साली संमत करण्यात आला. परंतु, बऱ्याच गोष्टी केवळ कायद्याने बदलत नाहीत. त्यासाठी आधी मानसिकता बदलावी लागते. प्रत्येक जीवाला या पृथ्वीवर सुखाने जगण्यासाठी अन्न, पाणी, निवाऱ्याची गरज आहे आणि तो त्याचा हक्कही आहे. हेच ओळखून सुनेत्रा भद्रे यांचे काम सुरू आहे.
२००३ साली सुनेत्रा भद्रे यांनी एक जर्मन शेफर्ड जातीचा श्वान घेतला होता. त्यामुळे त्यांना श्वान या प्रजातीची माहिती अधिक होत गेली. त्यांचे आजार-उपचार, त्यांचे भावनिक विश्व हे सगळं त्या श्वानाने त्यांना शिकवलं... नकळत रस्त्यांवर फिरणारे भटके श्वान, त्यांचे त्रास समजू लागले... त्यांचा त्रास कमी करण्यासाठी व त्यांनाही सुखाने जगण्याचा हक्क आहे, तो त्यांना मिळवून देण्यासाठी कायद्याचा आधार घेऊन त्यांनी श्वानांच्या संरक्षणासाठी काम करण्यास सुरुवात केली. प्राणी हक्काचे कायदे समजले तेव्हापासून त्यांनी अधिक जोमाने काम केले. याची पावती म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या प्राणी हक्क समितीवरही त्यांची निवड झाली व गेली आठ वर्षे या समितीवर त्यांनी काम केले.
श्वानांच्या संरक्षणासाठी काम करण्यास सुरुवात केल्यावर एका माणसाने दोन महिन्यांच्या श्वानाच्या पिल्लांना सातारा जिल्ह्यातील डोंगराळ भागातील बंगल्यात डांबून ठेवलं होतं. त्यांना अन्नसुद्धा धड नव्हतं. त्यांना गॅस्ट्रो झाला होता. त्या माणसावर त्यांनी पोलिसांच्या सहकार्याने कारवाई केली तसेच त्या पिल्लांना ताब्यात घेऊन औषधोपचाराने बरे करून चांगल्या व प्राण्यांविषयी सहसंवेदना बाळगणाऱ्या कुटुंबांकडे दत्तक दिली. अशाप्रकारे सुनेत्रा भद्रे यांनी अनेक श्वानांची छळातून मुक्तता केली आहे.
श्वानाची प्रजाती बेसुमार वाढू नये म्हणून नसबंदी आवश्यक आहेच. याविषयीसुद्धा कायदा आहे. नियम आहेत. ते नियम म्हणजे ज्या भागातून शस्त्रक्रिया (नसबंदी) करण्यासाठी श्वान उचलतात, त्याच भागात, गल्लीत, गावात शस्त्रक्रिया केल्यानंतर जखम पूर्ण बरी झाल्यानंतर सोडावे लागते. जखम पूर्ण बरी होण्यासाठी औषधोपचार, चांगला आहार, एकाच जागी ठेवून किमान पाच दिवस उपचार करणे गरजेचे असते. तसेच अशा शस्त्रक्रिया करताना पावसाळा आणि त्यांचा मेटिंग पिरियड सोडून शस्त्रक्रियेचा काळ आणि वेळ ठरवावी लागते. तर मादी श्वान असतील तर त्यांची सोनोग्राफी करूनच शस्त्रक्रियेचा निर्णय घ्यावा लागतो. हे ओळखून सुनेत्रा भद्रे यांनी साताऱ्यात नियमांविषयी जनजागृती केली व आजही करत आहेत.
त्याचबरोबर बेकायदेशीर मार्गाने श्वानाची होणारी हत्या हे तर अमानुषपणाचे लक्षण आहे. प्राण्यांनाही बुद्धी असते. जे मदत करतात त्यांना ते आयुष्यभर विसरत नाहीत. परंतु, माणसाची बुद्धी सर्व प्राणीमात्रांपेक्षा विकसित असली तरी लोकांना कायदा करूनही काही गोष्टी सांगाव्या लागतात हे खरंतर दुर्दैवच आहे, असेही त्यांचे मत आहे.
कोट :
खरंतर माणसाने स्वतःहून प्राण्यांच्या मदतीला आलं पाहिजे. आपल्या संस्कृती व परंपरेत कित्येक प्राण्यांची पूजा केली जाते. परंतु, ते सुद्धा स्वीकारून वा नाकारून माणूस सोयीने जगतो, याची मनस्वी चीड येते. पण, एक दिलासादायक गोष्ट म्हणजे साताऱ्यात तरुण-तरुणींचा एक गट सध्या मुक्या जीवांसाठी मनापासून काम करत आहे. हे पाहून संवेदनशीलता अजूनही जिवंत आहे. याचा प्रत्यय येतो. ही समाधानाची व सातारकर म्हणून अभिमानाची गोष्ट आहे. - सुनेत्रा भद्रे
फोटो दिनांक १९ सातारा डॉग फोटो...
- नितीन काळेल
.........................................................................