संडे स्पेशल इन्ट्रो आणि लेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:39 IST2021-05-23T04:39:51+5:302021-05-23T04:39:51+5:30
जळीस्थळी निव्वळ कोरोना ऐकून आणि वाचून जिथं सामान्य विटले तिथे प्रत्यक्ष रणभूमीत उतरून काम करणाऱ्यांची काय अवस्था झाली असेल ...

संडे स्पेशल इन्ट्रो आणि लेख
जळीस्थळी निव्वळ कोरोना ऐकून आणि वाचून जिथं सामान्य विटले तिथे प्रत्यक्ष रणभूमीत उतरून काम करणाऱ्यांची काय अवस्था झाली असेल याचा विचार न केलेलाच बरा ! बारा-बारा तास ओसाड रस्त्यांवर बंदोबस्तासाठी उभे असलेले पोलीस, पॉझिटिव्ह रुग्णांना बरे करणारे डॉक्टर, सामान्यांना बेडसह औषधे पुरविणारे प्रशासन, यात्रा-जत्रा रद्द झाल्याने बेरोजगारी झेलणारे कलाकार हे सगळे सध्या ताणतणावात आहेत. हा ताण घालविण्यासाठी कोण काय करतंय आणि स्वत:ला कसं सक्षम ठेवतंय, हे शोधण्याचा हा छोटासा प्रयत्न...!
टेन्शन लेने का नहीं...!
जगण्या-मरण्याच्या पुसटशा रेषेदरम्यान खंबीरपणे ते उभे आहेत... कोरोनाचाही मुकाबला करायला ते ऑनड्यूटी आहेत... कोरोनाने सहकाऱ्याला जेरबंद केलं तरीही त्याचं काम करून त्यांनी अखंड रुग्णसेवा केली... रुग्णाला वाचविण्याची जबाबदारी, औषधे मिळविण्यापासून नातेवाइकांना धीर देण्यापर्यंतचे काम करताना येणारा ताण न सांगण्यासारखा आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांनी स्वत:मध्ये सकारात्मक विचार पेरून हा ताण घालवत असल्याचे सांगितले. यासाठी वाचन, वेबसीरिज, गाणी, मोटिव्हेशनल विचार तर कोणी निव्वळ हास्यमालिका पाहून ताण घालविल्याचे सांगितले.
कोविड रुग्णांमध्ये राहून रोजच कोरोनाची शिकार करणाऱ्या योद्ध्यांना त्यांचा घात होऊ नये यासाठी काळजी घ्यावी लागते. हा संसर्ग किती भयानक आहे, हे खूप जवळून पाहणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील घटकाला याच्या संसर्गाची सर्वाधिक भीती आहे; पण रोजच्या या भीतीवर विजय मिळवून हे योद्धे सलग वर्षभर अविरतपणे लढाई लढत आहेत. अंगाखांद्यावर बसलेला कोरोना कधी नाकावाटे शरीरात पोहोचून हल्ला करील हे माहीत नसल्याने वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येकजण आवश्यक काळजी घेतो आहे. उपचार करताना अचानक उद्भवणारी इमर्जन्सी, कोसळत जाणारे अवयव आणि गतप्राण होणारे देह रोजच्या रोज पाहणं प्रचंड तणाव देऊन जातं. ड्यूटी संपवून जाताना ठणठणीत असणारा तिशीतला रुग्ण अचानक जातो आणि आपल्या किंवा आप्तांच्याबाबतही हे घडू शकतं या विचारानेही मन खिन्न होतं. दिवसभर कामाच्या व्यापात विचारचक्र बंद असलं तरीही घरी आप्तेष्टांना भेटल्यानंतर प्रचंड खळबळ जाणवते हे नक्की.
सर्वत्र तणाव घेऊन जगणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील अनेकांना या दिवसांत सु्ट्टीचा आनंद घेता आला नाही. जादा काम करून कंटाळलेले जीव या ताणातही स्वत:ला सकारात्मकतेने कार्यप्रवृत्त करीत आहेत. यासाठी कोणी गाण्यांच्या प्रेमात आहे, तर कोणाला वेबसीरिज दिलासादायक वाटतात, कोणी निव्वळ हसण्याच्या मालिका पाहतेय; तर कोणी मिळेल तो वेळ निसर्गाच्या सान्निध्यात घालविण्याचा प्रयत्न करतंय. काहींनी पुस्तकाला दोस्त बनवून चक्क आत्मचरित्र वाचून स्वत:ला अधिक खंबीर बनविण्यासाठी प्रयत्न केलाय. कोविडच्या या संकटकाळात आपले छंद जोपासूनही काहींनी तणावापासून मुक्ती मिळविण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रगती जाधव-पाटील