भेकवलीत शेकडो वृक्षांची कत्तल...
By Admin | Updated: January 25, 2015 00:40 IST2015-01-25T00:37:49+5:302015-01-25T00:40:22+5:30
कारवाईची प्रक्रिया सुरू : कोल्हापुरातील उद्योगपतीच्या मिळकतीकडे वन, महसूल, पोलीस खात्याची धाव

भेकवलीत शेकडो वृक्षांची कत्तल...
महाबळेश्वर : गडहिंग्लजचे उद्योगपती संग्राम अप्पासाहेब नलावडे यांच्या भेकवली, ता. महाबळेश्वर येथील मिळकतीमधील शेकडो वृक्षांची कत्तल विनापरवाना केल्याचे कळताच वन, महसूल आणि पोलीस विभागाने घटनास्थळी धाव घेतली आहे. शनिवार रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी कारवाई करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू होती.
महाबळेश्वरपासून सहा किलोमीटरवर भेकवली गाव आहे. तेथील डोंगर उतारावर गडहिंग्लज येथील उद्योगपती संग्राम नलावडे यांची सहा एकर व आठ गुंठे अशी मिळकत आहे. ही मिळकत डोंगर उतारावर असली तरी खाली मोठी दरी आहे. त्याचबरोबर समोर हिरवागार डोंगर आणि डाव्या बाजूला लिंगमळा वॉटर फॉल असे विहंगम दृश्य या मिळकतीमधून नजरेस पडते.
स्थानिक दलालाने सुमारे २५ कामगारांच्या मदतीने गेले दोन दिवस या मिळकतीमधील वृक्षतोड सुरू केली. कुऱ्हाडी, कोयती घेतलेल्या कामगारांनी दोन दिवसांत मिळकतीमधील शेकडो वृक्षांची कत्तल केली. यामध्ये जांभळ, गेळा, हिरडा, भौमा अंजन, तांबट पिसा आदी वनौषधी वृक्षांचा समावेश आहे.
दरम्यान, या मिळकतीला लागूनच भेकवली गावाची पाणीपुरवठा योजनेची टाकी आहे. या टाकीतून पाणी सोडण्यासाठी आलेल्या धनंजय केळगणे व शिवाजी केळगणे यांना हा प्रकार समजला. त्यांनी हा प्रकार सरपंच सीताराम केळगणे यांना सांगितला. त्यांनी ही वृक्षतोड थांबविली. तसेच याबाबत त्यांनी वन, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. माहिती मिळताच तहसीलदार अतुल म्हेत्रे हे भेकवलीतील घटनास्थळी आले. वृक्षतोडीची पाहणी केली. वृक्षतोडीच्या पंचनाम्याचे व वृक्षतोड करणाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले. रविवारपर्यंत संबंधितांवर गुन्हा नोंद होईल, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)