मानधनातून सुकन्या योजना आळजापूर ग्रामपंचायतीचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:11 IST2021-03-13T05:11:54+5:302021-03-13T05:11:54+5:30
आदर्की : स्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबळी यासारखे मुलींबाबत होणारे प्रकार थांबविण्यासाठी आळजापूर (ता. फलटण) ग्रामपंचायतीने सरपंच, उपसरपंच, सदस्यांना वर्षाकाठी मिळणाऱ्या ...

मानधनातून सुकन्या योजना आळजापूर ग्रामपंचायतीचा निर्णय
आदर्की : स्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबळी यासारखे मुलींबाबत होणारे प्रकार थांबविण्यासाठी आळजापूर (ता. फलटण) ग्रामपंचायतीने सरपंच, उपसरपंच, सदस्यांना वर्षाकाठी मिळणाऱ्या मानधनातून गावात जन्माला येणाऱ्या मुलींच्या नावे पाच हजार रुपयांची अठरा वर्षांची ठेव पावती बनविण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम त्या मुलीच्या विवाह सोहळ्यावेळी मिळणार असल्याने या अभिनव उपक्रमाबद्दल परिसरातून आळजापूर ग्रामपंचायतीचे कौतुक होत आहे.
आळजापूर (ता. फलटण) ग्रामपंचायतीची निवडणूक होऊन सरपंच, उपसरपंचांची निवड झाली. त्यानंतर ८ मार्च रोजी महिला दिनी मासिक बैठक होऊन गावाच्या विकासासोबतच पायाभूत सुविधांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना वर्षाकाठी मिळणारी मानधनाची रक्कम आळजापूर गावाच्या कार्यक्षेत्रात दिनांक ८ मार्च २०२१ ते २८ फेब्रुवारी २०२२पर्यंत जन्माला येणाऱ्या मुलींच्या नावे प्रत्येकी पाच हजार रुपयेप्रमाणे ठेवून अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीच्या विवाह सोहळ्याला ही रक्कम देण्यासाठी आळजापूर ग्रामपंचायतीने ‘सुकन्या ठेव योजना’ राबविण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे.
यावेळी सरपंच दिलीपराव नलवडे, उपसरपंच राजकुंवर नलवडे, शुभम नलवडे, सचिन मसुगडे, सुनील पवार, छाया नलवडे, पुष्पा पवार, गीतांजली नलवडे, उज्ज्वला भंडलकर आदी सदस्य उपस्थित होते.
कोट..
स्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबळी, मुलींची घटती संख्या, आदी प्रकार वाढत आहेत. मुलगी शिकून मोठी होते; तिच्या विवाहाच्या वेळी असणाऱ्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून आपल्या मानधनातून गावात मुलगी जन्माला आली की, तिच्या नावावर पाच हजार रुपये ठेवण्याचा निर्णय सर्व सदस्यांनी घेतला आहे.
- दिलीप नलवडे, सरपंच, आळजापूर