प्रेमसंबंधातून युवकाची मुचंडीमध्ये आत्महत्या

By Admin | Updated: May 22, 2016 00:32 IST2016-05-22T00:32:40+5:302016-05-22T00:32:40+5:30

रावळगुंडवाडीत खळबळ : लग्नाला विरोध

Suicides in love with youth | प्रेमसंबंधातून युवकाची मुचंडीमध्ये आत्महत्या

प्रेमसंबंधातून युवकाची मुचंडीमध्ये आत्महत्या

जत : तालुक्यातील रावळगुंडवाडी येथील राघवेंद्र चन्नाप्पा हिरगोंड (वय २०) याने प्रेमसंबंधातून मुचंडी (ता. जत) येथील वन विभागात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी आठच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे रावळगुंडवाडी गावात खळबळ माजली आहे.
राघवेंद्र हिरगोंड शेतमजूर होता. त्याचे मेंढेगिरी येथील एका सतरा वर्षाच्या दहावीत शिक्षण घेत असलेल्या मुलीसोबत मागील दोन वर्षापासून प्रेमसंबंध होते. एक-दोन महिन्यांपासून या प्रेमप्रकरणाची माहिती दोघांच्या घरातील लोकांना झाली होती. त्यांनी या प्रेमप्रकरणाला विरोध केला. त्यानंतरही या प्रेमीयुगुलाने घरात लग्नाचा प्रस्ताव ठेवला. त्यालाही नातेवाईकांनी विरोध केला. त्यामुळे राघवेंद्र नाराज होता.
शुक्रवार, दि. २० रोजी सकाळी राघवेंद्रच्या प्रेयसीने जत पोलिस ठाण्यात समक्ष येऊन ‘आपले राघवेंद्रवर प्रेम असून, माझे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर आम्ही दोघे लग्न करणार आहोत’, अशा आशयाचा लेखी अर्ज दिला. याची माहिती तिच्या नातेवाईकांना समजल्यानंतर त्यांनी तिला मारहाण केली. मारहाण केल्याची माहिती तिने राघवेंद्रला मोबाईलवरून सांगितली. त्यानंतर संबंधित मुलीचे नातेवाईक शुक्रवारी सायंकाळपासून राघवेंद्रचा शोध घेत होते. त्यामुळे राघवेंद्र दडपणाखाली होता. शनिवारी सकाळी सातच्यादरम्यान राघवेंद्र घरातून आंघोळ करून बाहेर पडला. त्यानंतर तो मुचंडी येथे वन विभागाच्या जागेत आला. आपण आत्महत्या करणार असल्याची माहिती त्याने स्वत: घरी मोबाईलवरून सांगितली. त्यानंतर झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचे नातेवाईक तेथे पोहोचेपर्यंत तो मृत झाला होता. याप्रकरणी पोलिस पाटील रोहिदास शिवशरण यांनी जत पोलिसात फिर्याद दिली आहे.

Web Title: Suicides in love with youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.