विवाहितेची मुलासह गंजीत पेटवून घेऊन आत्महत्या
By Admin | Updated: March 13, 2016 00:59 IST2016-03-13T00:52:04+5:302016-03-13T00:59:35+5:30
घटनेने परिसरात हळहळ

विवाहितेची मुलासह गंजीत पेटवून घेऊन आत्महत्या
मेढा : म्हाते खुर्द (ता. जावळी) येथील संगीता चंद्रकांत दळवी या विवाहित महिलेने आपला मुलगा सर्वेश चंद्रकांत दळवी (वय ९) याच्यासह भाताच्या गंजीत पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची दुर्घटना शनिवारी घडली. या दुर्घटनेत या मायलेकरांचा मृत्यू झाल्याची माहिती मेढा पोलिसांनी दिली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, म्हाते खुर्द येथे चंद्रकांत दळवी यांचे घर असून, त्यांना साहील व सर्वेश अशी दोन मुले आहेत. चंद्रकांत दळवी हे मुंबई येथे नोकरीस असतात. तर म्हाते खुर्द येथे दळवी यांची पत्नी संगीता व आई-वडील, मुले राहतात.
शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास संगीता या आपल्या सर्वेशला घेऊन घराबाहेर पडल्या. काही वेळानंतर संगीता यांच्या सासू-सासऱ्यांना संगीता व सर्वेश घरात नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर साहील व इतरांनी सगळीकडे शोध सुरू केला. दरम्यान, म्हाते खुर्द गावातील म्हसोबाचे शिवार नावाच्या शेतात भाताची गंजी पेटल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी संगीता व सर्वेश यांचा या आगीत होरपळून मृत्यू झाल्याचे आढळले. दरम्यान, ही आत्महत्या असल्याची परिसरात चर्चा असून, या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच चंद्रकांत दळवी हे मुंबईवरून गावी आले.
पोलिसांनी शवविच्छेदन करून या दोघांचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले. रात्री उशिरा या दोघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)