विद्यार्थ्यांनी बनविले ऊस पेरणी यंत्र !
By Admin | Updated: April 12, 2016 00:40 IST2016-04-11T23:02:05+5:302016-04-12T00:40:06+5:30
मेक इन सातारा : सूरज गावडे, सूरज दळवी, पंकज पाटील, प्रथमेश जगताप यांची डोक्यालिटी

विद्यार्थ्यांनी बनविले ऊस पेरणी यंत्र !
सातारा : तंत्रकौशल्य व कल्पकतेच्या जोरावर गौरीशंकरच्या पदवी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी आधुनिक पद्धतीचे ऊस पेरणी यंत्र विकसित केले आहे़ शेती व शेतकरी घटक हा केंद्रबिंदू मानून सामान्यातील सामान्य शेतकऱ्यालाही सहजपणे हाताळता येईल असे नावीन्यपूर्ण यंत्र विकसित केल्याने वेळेची व पैशाच्या बचतीबरोबर अचूकता साधली जाणार आहे़
या ऊस पेरणी यंत्रामुळे उत्पादन क्षमतेला चालना मिळणार आहे. वजनाने हालके असल्याने छोट्या ट्रॅक्टरच्या साह्याने शेतापर्यंत हे यंत्र सहज घेऊन जाता येत असल्याने शेतकऱ्यांचा वेळ वाचणार आहे़ विद्यार्थ्यांनी कमी खर्चात हे यंत्र विकसित केले आहे.
‘या यंत्राची उद्योगजगत व कंपन्यांनी दखल घेतली आहे. या संदर्भात काही तांत्रिक बदल घडवून बाजारपेठेत उपलब्ध करण्याचा मानस आहे़ हे यंत्र कृषीक्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवेल,’ असा विश्वास जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केला.
लिंब येथील सातारा कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अॅण्ड मॅनेजमेंट महाविद्यालयातील मॅकेनिकल विभागातील सूरज गावडे, सूरज दळवी, पंकज पाटील, प्रथमेश जगताप या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ऊस पेरणी यंत्र विकसित केले आहे़ त्याची यशस्वी चाचणी नुकतीच करण्यात आली आहे़ अल्प किमतीत तयार केलेल्या या यंत्रामुळे कमी वेळेत अधिक काम तसेच चार मजुरांचे असलेले काम केवळ एका मजुरामध्ये होऊ शकेल़
पारंपरिक पद्धतीने एक एकर उसाची लागवड करावयासाठी दोन दिवस लागत असतील तर हे यंत्र तेच काम केवळ चार तासांत करणार
आहे़
यंत्र निर्मितीसाठी विभाग प्रमुख प्रा़ आऱ पी. कुलकर्णी, प्रा़ आऱ व्ही़ निंबाळकर यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष प्रा़ मदन जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप, संचालक जयंवतराव साळुंखे, आप्पा राजगे, डॉ़ अनिरुद्ध जगताप, प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर, जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, प्राचार्य डॉ़ आलम शेख यांनी गौरव केला. (प्रतिनिधी)