हिंगणगाव येथे उसाला शॉर्टसर्किटने आग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:40 IST2021-09-03T04:40:38+5:302021-09-03T04:40:38+5:30

आदर्की : हिंगणगाव (ता. फलटण) येथील पांढरी नावाच्या शिवारातील उसाला शाॅर्टसर्किटने आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने गावातील चाळीस ...

Sugarcane short circuit fire at Hingangaon! | हिंगणगाव येथे उसाला शॉर्टसर्किटने आग!

हिंगणगाव येथे उसाला शॉर्टसर्किटने आग!

आदर्की : हिंगणगाव (ता. फलटण) येथील पांढरी नावाच्या शिवारातील उसाला शाॅर्टसर्किटने आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने गावातील चाळीस ते पन्नास तरुणांनी धाव घेऊन पन्नास एकर ऊस आगीपासून वाचवल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान टळल्याने तरुणांचे कौतुक होत आहे.

आदर्की खुर्द-हिंगणगाव रस्त्यावर पांढरी नावाच्या शिवारात उल्हास प्रकाश विधाते यांचा गट नं. १०१४ मध्ये दहा ते अकरा महिन्यांचा ऊस आहे. या शेतात त्यांचे नातेवाईक दीपक परबती भोईटे (रा. हिंगणगाव) हे उसाला पाणी देत असताना सकाळी दहा ते अकराच्यादरम्यान शॉर्टसर्किट होऊन उसात ठिणग्या पडल्याने उसाला आग लागल्याने त्यांनी वायरमन व गावातील तरुणांना माहिती दिली. तोपर्यंत पाच ते दहा गुंठे शिवारात आग पसरली. त्यादरम्यान वीजपुरवठा खंडित करण्यात आला, तोपर्यंत गावातील तरुण, ग्रामस्थांनी झाडांचे डहाळे तोडून त्याच्या साह्याने उसाला लागलेली आग आटोक्यात आणली. पांढरी नावाच्या शिवारात पन्नास ते साठ एकर ऊस आहे. तरुणांनी वेळेत आग विझविली नसती, तर अनेक एकरातील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडून अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असते. तरुणांनी आग आटोक्यात आणल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

घटनास्थळाचा पंचनामा तलाठी श्रीरंग चव्हाण यांनी केला आहे. दरम्यान, हिंगणगावचे वीज वितरणचे कनिष्ठ अभियंता यांनी भेट दिली.

कोट..

मी उसाला पाणी देत असताना खांबावर शाॅर्टसर्किट होऊन ठिणग्या उसात पडल्याने उसाला आग लागली. तरुणांनी आग विझविल्याने लाखो रुपयांचे होणारे नुकसान टळले आहे.

- दीपक भोईटे, शेतकरी, हिंगणगाव

कोट...

संबंधित शेतकऱ्याच्या बांधावर वीज सुरू-बंद करण्यासाठी स्टार्टर बसवला आहे. पण तो चालू-बंद करताना शाॅर्टसर्किट होत नाही. शेतकऱ्याच्या उसातून सर्व्हिस केबल गेली आहे. तिला जोड होता. त्यामधून शॉर्टसर्किट होऊन आग लागली असावी. ती केबल बदलण्यात आली आहे.

- एस. टी. माने, कनिष्ठ अभियंता, हिंगणगाव

फोटो १) हिंगणगाव (ता. फलटण) येथे आगीने जळालेला ऊस. २ ) उसाच्या फडाला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी आलेले तरुण वर्ग.

Web Title: Sugarcane short circuit fire at Hingangaon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.