ऊस कडू अन् आले झाले गोड...
By Admin | Updated: May 29, 2015 00:06 IST2015-05-28T21:47:11+5:302015-05-29T00:06:37+5:30
कालगाव-मसूर : ३० एकर क्षेत्रात लागवड; आंतरपिकांनाही प्राधान्य

ऊस कडू अन् आले झाले गोड...
जगन्नाथ कुंभार = मसूर -ऊसशेतीला फाटा देत बेलवाडी-मसूर येथे शेतामध्ये आले लागण धुमधडाक्यात सुरू असून शेतकऱ्यांनी जवळपास ३० एकर क्षेत्रावर आल्याची लागण केली आहे.आले पीकाला लागण करताना मोठी मेहनत घ्यावी लागत आहे. सुरूवातीला शेतीची नांगरणी करायची नंतर ते शेत रोटॅव्हेटरने आगदी भुसभुशीत करायचे व नंतर गादी वाफे करून त्यामध्ये आल्याची लागण करावी लागत आहे. सध्या ऊस दराची परवड पाहता उसशेतीला फाटा देत नगदी उत्पन्न देणारे आले पिकाकडे शेतकरी वळले आहे. आले या पिकाबरोबरच मिरची, घेवडा , गहू ही आंतरपीके घेऊन उसापेक्षा एकरी जास्तीच उत्पन्न निघेल असे शेतकरी तानाजी संकपाळ, आप्पासो फडतरे, सागर संकपाळ, नवनाथ बोबडे, गणेश फडतरे, बबन बोबडे, प्रल्हाद फडतरे, दादासो बोबडे या शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
असा येतो खर्च
एक एकर आले लागण करत असताना एकराला १००० किलो बियाणे लागत आहे. त्यासाठी ५०० किलोच्या गाडीला १८००० प्रमाणे दोन गाडीचे मिळून ३६००० रूपयाचे बियाणे खरेदी करावे लागत आहे. लावणी करताना आले लागणीच्या माहितीचेच मजूर आणावे लागत आहेत. त्यांना गुंठयाला १२५ प्रमाणे एकराला ५००० हजार रूपये मजूरी द्यावी लागत आहे.अशी माहिती शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
ऊस शेतीतून मिळणारे उत्पन्न अगदीच नगन्य आहे. यामुळे शेतामध्ये दुसरे कोणते नगदी पीक येईल या विषयी मातीपरीक्षण केले तर आमची शेती आले पीकाला पोषक असल्याचे आढळून आल्याने आम्ही आल्याची लागण करीत आहे.
- राजेंद्र जाधव, शेतकरी