साडेसतरा लाखांचा ऊस खाक
By Admin | Updated: December 29, 2014 23:54 IST2014-12-29T22:24:57+5:302014-12-29T23:54:19+5:30
चौधरवाडीतील घटना : वीजवाहक तार तुटून पडल्याने भडकली आग

साडेसतरा लाखांचा ऊस खाक
फलटण : चौधरवाडी, ता. फलटण गावाजवळ उसाच्या क्षेत्रावरुन जाणारी वीजवाहक तार तुटून खाली पडल्याने सुमारे १० ते १२ एकर क्षेत्रातील उभा ऊस जळून खाक झाला. या घटनेमुळे ६ शेतकऱ्यांचे सुमारे १७ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल यंत्रणेने पंचनाम्याद्वारे व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
चौधरवाडी-खुंटे रस्त्यावरील तुकाराम कृष्णाजी पिसाळ व सुमन तुकाराम पिसाळ यांच्या सर्व्हे नं १८/६/१ या जमिनीतील उभ्या उसाच्या पिकात वीजवितरण कंपनीची वीजवाहक तार तुटून आज (सोमवार) दुपारी दीडच्या सुमारास खाली पडली आणि वीजप्रवाहामुळे उसाच्या पिकाने पेट घेतला. त्यामध्ये पिसाळ यांचा १ हेक्टर ४० आर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला. त्याचबरोबर या क्षेत्रात ठिबक सिंंचन यंत्रणा बसविण्यात आली असल्याने उसाच्या पिकाबरोबर ही यंत्रणाही जळून खाक झाली. पिसाळ यांच्या उसपिकाचे ५ लाख ५० हजार आणि ठिबक सिंंचन यंत्रणेचे १ लाख ५० हजार असे एकूण सुमारे ७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करुन गावकामगार तलाठ्यांनी तसा पंचनामा केला आहे.
तुकाराम पिसाळ यांच्या शेजारी असलेले योगेश कृष्णाथ नेवसे यांचा ६० आर क्षेत्रातील, कृष्णाथ गोविंंद नेवसे यांचा ६० आर क्षेत्रातील, सुमन वसंत पवार यांचा ८० आर क्षेत्रातील, पकुर्डी तरंग भोसले यांचा ३० आर क्षेत्रातील, सुधाकर सोनबा डेंगे यांचा ४० आर क्षेत्रातील उभा ऊस या आगीने जळून भस्मसात झाला असून त्यामध्ये योगेश नेवसे यांचे ३ लाख रुपयांचे, कृष्णाथ नेवसे यांचे ३ लाख रुपयांचे, सुमन पवार यांचे २ लाख २५ हजार रुपयांचे, पकुर्डी भोसले यांचे ८५ हजार रुपयांचे, सुधाकर डेंगे यांचे १ लाख ४० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. याबाबत पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली आहे. वीजवितरण कंपनीने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
मोठे क्षेत्र कौशल्याने वाचविले
वीजपुरवठा खंडित झाल्याने आग विझविण्यासाठी पाणी उपसा करता आला नाही. तथापि, लगतच्या क्षेत्रातील ऊस आगीपासून वाचविण्यासाठी शेजारच्या क्षेत्रात उसतोड सुरू असल्याने तोडणी मजुरांची टोळी आणून लगतच्या उसाच्या क्षेत्रात आग पसरणार नाही यासाठी काही क्षेत्रातील उस तोडून बाजूला करण्यात आला. त्यामुळे मोठे क्षेत्र आगीपासून वाचविण्यात यश आले.