साखर बाजारात..ऊसदर मात्र बासनात!
By Admin | Updated: December 2, 2014 23:34 IST2014-12-02T21:58:26+5:302014-12-02T23:34:55+5:30
शेतकऱ्यांमध्ये संभ्रम : सत्ताधारी, विरोधकांचे मौन करतेय अस्वस्थ

साखर बाजारात..ऊसदर मात्र बासनात!
फलटण : यंदाच्या हंगामात तयार झालेली साखर बाजारात जाण्याची वेळ आली तरीही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखानदाराकडून उसाचा पहिला हप्ता न मिळाल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडून हैराण झाला असून कारखानदाराकडून सततच्या मिळणाऱ्या कमी दरामुळे यावर्षीतरी चांगला दर मिळणार का, या विवंचनेत ते आहेत. कारखाने सुरळीत चालूू असल्याने कारखानदार तुपाशी तर ऊसउत्पादक उपाशी असे चित्र दिसत आहे.
फलटण तालुक्याला दिवसेंदिवस ऊस उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. धोम-बलकवडीचे पाणीही तालुक्यात आल्याने बागायती क्षेत्रात वाढ होवून त्या भागातील शेतकऱ्यांनीही ऊसाचे उत्पादन घेते आहे. परिणामी आज तालुक्यात जवळपास १६ ते १७ लाख मे. टन ऊस उपलब्ध असून एवढे गाळप करणे तालुक्यातील दोन्ही कारखान्यांना शक्य होणार नाही. त्यामुळे शेजारील तालुक्यातील कारखान्याकडे ऊस पाठविण्याचा नादात ऊसउत्पादक शेतकरी वर्ग आहे.
एकीकडे लवकरात लवकर ऊस घालवुन रान मोकळे करुन दुसरे पिक कसे घेता येईल या गडबडीत ऊस उत्पादक असताना दुसरीकडे गेलेल्या ऊसाला पहिला हप्ताच न मिळाल्याने दुसरे पिक कसे घ्यावे या आर्थिक विवंचनेत ऊसउत्पादक शेतकरी आहे. दरवर्षी आॅक्टोबर महिना उजाडला की कारखानदार विरुद्ध शेतकरी संघटना असा संघर्ष पेटलेला असतो. ऊसदरावरुन खेचाखेची सुरू होते. मात्र, यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना सत्तेत गेल्यामुळे तसेच त्यांनी पहिली उचल २७०० रुपये मागुन शांत राहणे पसंद केल्यामुळे आंदोलनाची हवाच निघुन गेली आहे. ऊसदरासंदर्भात कोणताच नेता किंवा सत्ताधारी विरोधक बोलावयास तयार नाही. कारखानदारांच्या विरोधात कोणी बोलत नसल्याने व हंगाम सुरळीत चालु असल्याने कारखानदार तुपाशी तर ऊसउत्पादक उपाशी असे चित्र स्पष्ट दिसत आहे. गत दोन वर्षात पडलेला दुष्काळ, निसर्गाचा लहरीपणा त्यातच अवकाळीने दिलेला तडाखा यामुळे ऊसउत्पादक अडचणीत आला आहे. त्यातच मजुरीचे, खताचे वाढलेले दर व मिळालेला कमी दर यामुळे शेती करणेच जिकिरीचे होवू लागले आहे. आर्थिक अडचणीच्या नावाखाली इतरांच्या मानाने दोन्ही कारखाने कमी दर देत असल्याने व ऊसउत्पादकांची संघटीत ताकद कमी पडत असल्याने कारखानदारांचे फावत चालले आहे.
शासनानेही ऊस उत्पादक शेतकऱ्यांबाबत चर्चेचे गुऱ्हाळ लावुन त्यांना वाऱ्यावर सोडल्यामुळे आम्हाला कोणीवाली आहे का नाही? असा सतंप्त सवाल ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधून उपस्थित होत
आहे. (प्रतिनिधी)
दोन कारखान्यांना गाळपाचे आव्हान
मागील गळीत हंगामात श्रीरामसह साखर कारखान्याकडे ३ लाख ५६ हजार मे. टन ऊसाचे गाळप करुन २१०० रु दर दिला. तर न्यू फलटण शुगर वर्क्सने २ लाख ८३ हजार मे. टन ऊसाचे गाळप करुन २०७५ रु. दर दिला. या हंगामात ऊसाची मोठी उपलब्धता पाहता दोन्ही कारखान्यांना दहा लाख मे. टन तरी गाळपाचे आव्हान पेलावे लागणार आहे.
फलटण तालुक्यातील दोन्ही साखर कारखानदार ऊस दराबाबत गळचेपीची भूमिका घेत आहे. दरवर्षी दर कमी द्यायचाच पण एफआरपीप्रमाणेही दर कमी द्यायचा असेच उद्योग सुरू आहेत. या हंगामात दरासंदर्भात आम्ही आक्रमक भूमिका घेणार आहे.
- अॅड. नरसिंह निकम, अध्यक्ष फलटण तालुका संघर्ष समिती