विंगमध्ये पोलिओ लसीकरण यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:13 IST2021-02-05T09:13:10+5:302021-02-05T09:13:10+5:30
कऱ्हाड : कोळे, ता. कऱ्हाड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत विंग येथे पल्स पोलिओ लसीकरणाला जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले यांच्याहस्ते ...

विंगमध्ये पोलिओ लसीकरण यशस्वी
कऱ्हाड : कोळे, ता. कऱ्हाड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत विंग येथे पल्स पोलिओ लसीकरणाला जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले यांच्याहस्ते प्रारंभ झाला. पोलीसपाटील रमेश खबाले, तानाजी मोहिते, कोळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी सुनीता थोरात, आरोग्य उपकेंद्राच्या अधिकारी अर्चना यादव, आरोग्य सहायक पंकज नलवडे, युवराज शेवाळे, संतोष जाधव, प्रगती जाधव, विनया पाचपुते, सरिता खबाले, सुषमा कणसे, भाग्यश्री पाटील, सोनाली सोनवणे, सुजाता घोडके उपस्थित होत्या.
कऱ्हाडात मनसे कार्यकर्त्यांचे आंदोलन
कऱ्हाड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने योगेश खडके यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात कऱ्हाडमध्ये आंदोलन करण्यात आले. पेट्रोल, डिझेल दरवाढ मागे घ्यावी, तसेच गॅस अनुदान पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
यावेळी योगेश खडके, चंद्रकांत पवार, स्वरूप निकम, भानुदास डाईगडे, स्वप्नील गोतपागर, अनिकेत कारंडे, दशरथ पवार, गिरीश मोहिरे, संजय तांबे, अमोल साठे, मनोहर सरगर, निखिल जाधव, भारती गावडे, मनीषा चव्हाण, स्नेहल मिसाळ, नितीन शिंदे, स्वप्नील पवार आदींसह कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
या स्वाक्षरी मोहिमेत १ हजार ५०० पेक्षा जास्त नागरिकांनी स्वाक्षरी करून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला.
शेरेतील अपघातग्रस्तांच्या वारसांना विम्याचा लाभ
वडगाव हवेली : शेरे, ता. कऱ्हाड येथील अविनाश दिलीप शिंदे यांचा काही दिवसांपूर्वी अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या वारसांना प्रधानमंत्री सुरक्षा योजनेअंतर्गत शेणोली येथील बँक ऑफ महाराष्ट्रकडून अपघाती विम्याचा लाभ मिळाला आहे. त्यांचे वडील दिलीप अधिकराव शिंदे यांच्या बँक खात्यामध्ये अपघाती विम्याची दोन लाख रुपयांची रक्कम नुकतीच वर्ग झाली. त्याचे पत्र शेणोली येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखा प्रबंधक अरविंदकुमार यांच्याहस्ते देण्यात आले. यावेळी उपशाखाप्रमुख परवीन कुमार, निखेश वानखेडे, रामचंद्र नामदास, बँक प्रतिनिधी भाऊसाहेब चव्हाण, तानाजी सूर्यवंशी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
मोरणा विभागात बिबट्याची दहशत
पाटण : तालुक्यातील मोरणा विभागातील नोटोशी, कुसरूंड, वाडीकोतावडे आणि आंब्रग येथे वारंवार बिबट्याचे दर्शन होत असून, त्याच्या डरकाळीने शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी शेतशिवारात जाणे बंद केल्यामुळे शेती, दुग्धव्यवसाय आणि पशुपालन व्यवसाय अडचणीत सापडले आहेत़ शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गाई-म्हशी, शेळीपालन करून दुग्ध व्यवसायासारखे शेतीपूरक उद्योग शेतकऱ्यांनी सुरू केले आहेत. परंतु गेल्या काही महिन्यांपासून या विभागात बिबट्याच्या वावरामुळे शेती आणि पूरक व्यवसाय अडचणीत सापडले आहेत.
पिंपरी ते रिसवड रस्ता दुरुस्त करण्याची मागणी
मसूर : पिंपरी ते रिसवड रस्त्याची दुरवस्था झाली असून हा रस्ता गेली अनेक वर्षे दुरुस्त केला नसल्याने दुरवस्थेत आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. संबंधीत रस्ता हा शामगाव घाटातून खाली येऊन कऱ्हाडला राष्ट्रीय महामार्गाला जाण्यासाठी सोयीचा मार्ग म्हणून बनवण्यात आला होता. मात्र, हा रस्ता उखडल्याने या मार्गावरून प्रवास करणे धोक्याचे बनले आहे. संबंधीत विभागाने या रस्त्याची पाहणी करून रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करावे, अशी मागणी रिसवड येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश इंगवले यांनी केली आहे.