बनवडीत ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:45 IST2021-09-14T04:45:07+5:302021-09-14T04:45:07+5:30
कोपर्डे हवेली : प्रशासनाची ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना प्रत्यक्षात राबविण्यासाठी बनवडी येथील ग्रामपंचायत आणि पोलीस ...

बनवडीत ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम यशस्वी
कोपर्डे हवेली : प्रशासनाची ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना प्रत्यक्षात राबविण्यासाठी बनवडी येथील ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाने पुढाकार घेऊन ग्रामपंचायतीच्या मालकीच्या सभागृहात ‘एक गाव, एक गणपती’ बसवून इतर गावांपुढे आदर्श उभा केला आहे.
बनवडी हे गाव कऱ्हाडपासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. या निमशहरी गावाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गावाचा विस्तार वाढत आहे. याठिकाणी तेरा गणेश मंडळे आहेत. शासनाच्या ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलीस प्रशासन यांच्याकडून सर्व ठिकाणी ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यासाठी प्रयत्न केले जातात. परंतु म्हणावे तसे यश मिळाले नाही. परंतु बनवडीचे सरपंच प्रदीप पाटील, उपसरपंच विकास करांडे आणि सहायक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांनी बनवडीत गणेश मंडळांना बैठक घेऊन सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून विश्वासात घेऊन आवाहन केले. यास बनवडीतील मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद देत गावात एकच सार्वजनिक गणपती बसविण्याचा निर्णय घेतला. यामध्ये गावातील सर्व मंडळांना एक एक दिवस ठरवून आरतीचा मान देण्यात आला आहे. ज्यादिवशी ज्या मंडळाचा दिवस आहे, ते मंडळ त्या दिवशीचे सर्व सोपस्कार पार पाडतात. आरतीसाठी सर्व मंडळांचे कार्यकर्ते कोरोनाचे सर्व नियम पाळत एकत्र येतात. यामुळे गावामध्ये सर्वत्र सलोख्याचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा फायदा गावाच्या विकासासाठी होणार आहे. यासाठी सरपंच प्रदीप पाटील आणि उपसरपंच विकास करांडे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.
चौकट
ठिकठिकाणी जलकुंभ
नदी, ओढे यांचे प्रदूषण रोखण्यासाठी सार्वजनिक आणि वैयक्तिक गणपती विसर्जन करण्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून जलकुंभाचे आयोजन करून प्रयत्न केले जात आहेत. त्याच धर्तीवर बनवडी ग्रामपंचायतीने अनंत चतुदर्शिला बनवडी ग्रामपंचायत चौक, बनवडी कॉलनी रिक्षा स्टँड आणि बनवडी कॉर्नर, विद्यानगर येथे जलकुंभ ठेवण्यात येणार आहेत. तसेच निर्माल्य एकत्र गोळा करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. नागरिकांनी गणेश मूर्तीचे विसर्जन याठिकाणी करावे, असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे. विसर्जित गणेश मूर्ती कऱ्हाड नगरपालिकेकडे सोपविण्यात येणार आहेत. गणेश भक्तांच्या श्रद्धेला तडा जाणार नाही, याची काळजी घेतली जाणार असल्याचे उपसरपंच विकास करांडे यांनी सांगितले.