यशस्वी आंतरराष्ट्रीय कामगिरीची हॅट्ट्रिक !
By Admin | Updated: August 4, 2016 01:29 IST2016-08-04T00:23:19+5:302016-08-04T01:29:23+5:30
ग्रामीण विद्यार्थ्यांचे यश : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मलेशियात सुवर्णयश

यशस्वी आंतरराष्ट्रीय कामगिरीची हॅट्ट्रिक !
भुर्इंज : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सलग तिसऱ्यांदा परदेशात यशस्वी कामगिरीची हॅट्ट्रिक करण्याची किमया केली आहे. पाचवड, ता. वाई येथील तिरंगा इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मलेशियात जाऊन आंतरराष्ट्रीय अॅबॅकस स्पर्धेत भारताचा विजयी झेंडा फडकावल्याने संपूर्ण परिसरातून या विद्यार्थ्यांवर कौतुक होत आहे. अमेरिका, इंग्लंड, रशिया, चीन, आॅस्ट्रेलिया, थायलंड, नेपाळ, तैवान, मलेशिया, भारत आदी २१ देशांमधील तब्बल १६३९ विद्यार्थी मलेशियात झालेल्या या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यामध्ये तिरंगाचे ४ विद्यार्थ्यांचा समावेश होता. विशेष म्हणजे, वृषाली रवींद्र पवार ( तिसरी), गिरिराज जयवंत पवार (पाचवी), सलील समीर राजे (पाचवी) आणि तन्मय सुविचार कुंभार (आठवी) या चारही स्पर्धकांनी रौप्य पदक व ट्रॉफी पटकावले.
मोठ्या संख्येने सहभागी झालेले देश आणि त्यांचे विद्यार्थी स्पर्धक, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हुशारीचा, कौशल्याचा या स्पर्धेत मोठा कस लागला. तरीही या जागतिक कामगिरीत सरस कामगिरी बजावत तिरंगाच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले घवघवीत यश विशेष उल्लेखनीय व सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना घेऊन मुख्याध्यापिका वैशाली कुंभार मलेशियाला गेल्या होत्या. यापूर्वी तिरंगा इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बँकॉक, थायलंड, नेपाळ या ठिकाणी यशस्वी कामगिरी बजावत आंतरराष्ट्रीय पातळीवर घवघवीत यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांची आता तैवान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना सुनीता पाडळे यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या अध्यक्षा पुष्पलता गायकवाड, सचिव जयवंत पवार, प्राचार्या वनिता पवार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांचे कौतुक केले. (प्रतिनिधी)