आरोग्य विभागाला मृत्युदर रोखण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:43 IST2021-09-06T04:43:45+5:302021-09-06T04:43:45+5:30
सातारा: जिल्ह्यात गेल्या पावणेदोन वर्षांपासून सुरू असणारे मृत्यूचे तांडव आता कुठे आटोक्यात येऊ लागलेय. कोरोनामुळे दिवसाला तब्बल चाळीस जणांचा ...

आरोग्य विभागाला मृत्युदर रोखण्यात यश
सातारा: जिल्ह्यात गेल्या पावणेदोन वर्षांपासून सुरू असणारे मृत्यूचे तांडव आता कुठे आटोक्यात येऊ लागलेय. कोरोनामुळे दिवसाला तब्बल चाळीस जणांचा मृत्यू झाला होता. हाच मृत्युदर आता केवळ एकवर आला आहे. आरोग्य विभागाला हा मृत्युदर रोखण्यासाठी यश आले असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात कोरोनाने पावणेदोन वर्षांपूर्वी शिरकाव केला. तेव्हापासून जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या काही कमी झाली नाही. पहिली लाट ओसरण्याआधीच दुसरी लाट सुरू झाली. या दुसऱ्या लाटेदरम्यान सहा हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला. रुग्णालयात एकही बेड शिल्लक नव्हता. त्यामुळे अनेकजणांचा घरातच मृत्यू झाला. एकंदरीत दुसऱ्या लाटेने सातारा जिल्ह्याला हादरून सोडले. आता कुठे कोरोनाची संख्या कमी होऊ लागलीय. मृत्युदर तर एकवर आला आहे. त्यामुळे आरोग्य विभागासह सातारकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात शनिवारी रात्री बारावाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या अहवालात ५४० कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर एकाचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाबाधितांची तालुक्यातील संख्या पुढीलप्रमाणे जावळी २८, कऱ्हाड ५०, खंडाळा २२, खटाव ६७, कोरेगांव ५७, माण ४३, महाबळेश्वर ३, पाटण ७, फलटण ११८, सातारा ११०, वाई २७ व इतर ८ असे ५४० रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत, तर ६७ जण कोरोनातून मुक्त झाले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ४१ हजार ९९८ जण कोरोनाबाधित आढळून आले असून, तब्बल ६ हजार ६० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच २ लाख २८ हजार ३४३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ११ हजार ९ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.