नियोजनामुळेच नागठाणेत कोरोना रुग्णवाढ रोखण्यात यश : बेंद्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:35 IST2021-05-22T04:35:32+5:302021-05-22T04:35:32+5:30
नागठाणे : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना गावातील नागरिकांच्या उत्तम सहकार्यातून तसेच नागठाणे ग्रामपंचायतीने वेळेवर उपाययोजना ...

नियोजनामुळेच नागठाणेत कोरोना रुग्णवाढ रोखण्यात यश : बेंद्रे
नागठाणे : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना गावातील नागरिकांच्या उत्तम सहकार्यातून तसेच नागठाणे ग्रामपंचायतीने वेळेवर उपाययोजना केल्यामुळे कोरोनाबाधित रुग्णसंख्या कमी करण्यात ग्रामपंचायतीला यश आले आहे’, अशी माहिती सरपंच डॉ. रूपाली बेंद्रे व उपसरपंच अनिल साळुंखे यांनी दिली.
ते म्हणाले, ‘गावात रुग्णसंख्या वाढत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ग्रामपंचायतीने तातडीने ग्रामस्तरीय आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन गावात भरणारा आठवडाबाजार व भाजीमंडई तत्काळ बंद केली. तसेच गावात संचारबंदी जाहीर करून लोकांच्या हालचालींवर निर्बंध आणले. गावातील नागरिकांनीसुद्धा यास अनुकूल प्रतिसाद दिला. याचबरोबर सोडियम हायपोक्लोराइडची संपूर्ण गावात फवारणी करण्यात आली. ज्या बाधितांच्या घरी विलगीकरण होणे शक्य नव्हते, त्यांच्यासाठी जिल्हा परिषद शाळेमध्ये स्वतंत्र विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू झाल्यानंतर होणारी गर्दी लक्षात घेता लसीकरण व स्वॅब तपासणीसाठी वेगवेगळ्या शाळांमध्ये स्वतंत्र सोय करण्यात आली. विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या व सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्या, मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर बोरगाव पोलीस स्टेशन व ग्रामपंचायतीमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच डेंग्यूसदृश रुग्ण आढळल्याने गावात फॉग मशीनद्वारे फवारणी करण्यात आली.
ग्रामपंचायतीने तत्काळ राबविलेल्या या निर्णयामुळे गावातील रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे. या संपूर्ण काळात आशा स्वयंसेविका व अंगणवाडीसेविका, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, प्राथमिक आरोग्य केंद्र, बोरगाव पोलीस स्टेशन व ग्रामस्थ यांचे उत्तम सहकार्य लाभले, अशी माहिती सरपंच डॉ. रूपाली बेंद्रे व उपसरपंच अनिल साळुंखे यांनी दिली.