अखेर सक्शन गाडीने उपसला मैला!
By Admin | Updated: August 20, 2015 21:41 IST2015-08-20T21:41:10+5:302015-08-20T21:41:10+5:30
सदर बझार परिसर चकाचक : ‘लोकमत’च्या वृत्तानंतर पालिकेची स्वच्छता मोहीम--लोकमतचा दणका

अखेर सक्शन गाडीने उपसला मैला!
सातारा : सदर बझार येथील मैला प्रकरण ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर प्रशासकीय व सामाजिक वातावरण ढवळून निघाले. पालिकेने संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करून काम बंद केले. पण अर्धवट कामामुळे तेथील रहिवाशांना ‘नरक’यातना सहन कराव्या लागत होत्या. बुधवारी पालिकेने वरवरची स्वच्छता केली. मात्र मूळ समस्या जैसे थे राहिली होती. आज सकाळी पुन्हा पालिकेने स्वच्छता मोहीम राबवून सक्शन गाडीच्या साह्याने टाकीतील मैला उपसला आहे. कामगारांनी शौचालयाच्या टाकीतला मैला बादलीनं उपसून नाल्यात ओतून दिल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. याविरोधात महिलांनी आक्रमक भूमिका घेतली होती. यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये ‘सदर बझार परिसरात पालिकेची ‘वरवरची स्वच्छता’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध होताच दुसऱ्या दिवशी पालिकेने पुन्हा स्वच्छता मोहीम हाती घेऊन सक्शन गाडीच्या साह्याने शौचालयाच्या टाकीतील मैला उपसला. तसेच सफाई कर्मचाऱ्यांनी स्वच्छताही केली. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी वरिष्ठ आरोग्य निरीक्षक शिवदास साखरे, भागनिरीक्षक रणदिवे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
तर नागरिकांचा उद्रेक झाला नसता
दोन आठवड्यांपूर्वी पालिकेच्या ठेकेदाराने येथील शौचालयाची टाकी साफ करताना कामगारांनी मैला बादलीने उपसून शेजारच्या नाल्यात ओतून दिल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळीच स्वच्छता मोहीम हाती घेतली असती तर नागरिकांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागले नसते.
सदर बझार येथील नवीन भाजीमंडई शेजारी असलेल्या शौचालयाची पालिकेने आज पुन्हा संपूर्ण स्वच्छता केली आहे. टाकीतील मैला सक्शन गाडीने काढला आहे, तसेच टाक्या धुवून घेतल्या आहेत. तसेच परिसरातील गटारेही स्वच्छ करण्यात आली आहेत.
- शिवदास साखरे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, नगरपालिका, सातारा