नेर धरणातील पाणी मागणी अर्ज सादर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:35 IST2021-01-21T04:35:24+5:302021-01-21T04:35:24+5:30
पुसेगाव : रब्बी हंगामासाठी नेर मध्यम प्रकल्पातील पाणी सोडण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यांत्रिकी विभागाचे कालवे दुरुस्ती आणि ...

नेर धरणातील पाणी मागणी अर्ज सादर करा
पुसेगाव : रब्बी हंगामासाठी नेर मध्यम प्रकल्पातील पाणी सोडण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यांत्रिकी विभागाचे कालवे दुरुस्ती आणि साफसफाईचे काम प्रगतिपथावर आहे. लवकरच सिंचन आवर्तन सोडण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज त्वरित भरून द्यावेत, असे आवाहन कृष्णा सिंचन आणि पाटबंधारे विभागाने केले आहे.
खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील ब्रिटिशकालीन नेर धरणात गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात क्षमतेइतका ४१६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला होता. १५ किलोमीटर लांबीच्या नेर मुख्य तसेच २४ आणि १५ किलोमीटर लांबीच्या येरळा उजव्या आणि डाव्या कालव्याद्वारे २६३६ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणता येऊ शकते. नेर, पुसेगाव, विसापूर, खातगुण, भांडेवाडी, खटाव, हुसेनपूर, धकटवाडी, कुरोली या गावांना सिंचनासाठी पाणी देण्याचे नियोजन सध्या सुरू आहे. कालवे जीर्ण झाल्यामुळे ओलिताखाली येणाऱ्या सर्वच १८ गावांना पाणी देणे शक्य होत नाही.
चालू वर्षीच्या रब्बी हंगामासाठी सिंचन आवर्तन सोडण्याच्या नियोजनासाठी कालवे सल्लागार समितीची होणारी बैठक ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेमुळे होऊ शकली नाही. यांत्रिकी विभागाकडून सुरू असलेले कालवे दुरुस्ती आणि साफसफाईचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून ४५० हेक्टर क्षेत्रावरील पाणी मागणी अर्ज आल्यावरच रब्बी हंगामासाठी आवर्तन सोडण्यात येणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी त्वरित अर्ज भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.