मुलींचे लक्ष वेधण्यासाठी स्टंटबाजी
By Admin | Updated: August 14, 2015 00:16 IST2015-08-13T22:27:28+5:302015-08-14T00:16:45+5:30
दुचाकीस्वारांची धूमस्टाईल : मानसिक त्रास सहन करीत मुलीं घेतायत शिक्षण

मुलींचे लक्ष वेधण्यासाठी स्टंटबाजी
संजीव वरे-वाई वाईचे किसन वीर महाविद्यालय हे परिसरातील व तालुक्याच्या ग्रामीण भागातील शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमुख केंद्र आहे. सवलतीच्या मासिक पासची सोय असलेली एसटी बस हेच मुख्य प्रवासाचे साधन आहे. बसच्या प्रवासादरम्यान टवाळखोर विद्यार्थ्यांच्या उचापतींमुळे मुलींना मानसिक त्रास सहन करत प्रवास करावा लागत आहे.
वाईपासून २५ किलोमीटर पेक्षाही जास्त अंतर असलेल्या दुर्गम व ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहरात येतात. त्यामुळे बसमध्ये दाटीवाटीने उभे राहून प्रवास करावा लागतो. मुलं मागच्या सीटवर जागा बळकावून दंगा करत बसतात. पायाने स्पर्श करणे, मोबाईलवर गाणी वाजविणे, सीटच्या मागे मुलींची नावे लिहिणे असे उद्योग मागच्या सीटवर बसून सुरू असतात.दोन गटांत हाणामारी होते. हा राडा गावापर्यंत पोहोचतो अन् पुन्हा दोन गावे एकमेकांना भिडतात. असे प्रकार घडत आहेत.शहरात कॉलेजला आल्यानंतर मुलांच्या शहरातील इतर मुलांच्या ओळखी होता. अशा टोळक्यांचा मारामारीसाठी वापर केला जातो. काही जण तर ज्या थांब्यावर मुली उतरतात, तिथे जाऊन थांबतात तर काही जण बसचा दुचाकीवरून पाठलाग करतात.
लक्ष वेधण्यासाठी स्टंटबाजी
वाईच्या बसस्थानकापासून कॉलेजपर्यंतच्या मार्गावर काही युवक धूमस्टाईल गाडी चालवून स्टंटबाजी करतात. रस्त्याने चाललेल्या मुलींना कट मारले जातात. आपल्याकडे लक्ष जावे, यासाठी असे उद्योग केले जातात.
शैक्षणिक नुकसान
कॉलेज म्हणजे मौजमस्ती, अशी धारणा झालेल्या मुलांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही. टवाळक्या करण्यातच ते वेळ घालवत असतात. बसस्थानक परिसरात, महाविद्यालयाच्या मार्गावर मुलं टोळक्याने फिरताना दिसतात.