विद्यार्थ्यांचे मूल्यमापन दहा तारखेपासून

By Admin | Updated: April 10, 2015 00:23 IST2015-04-09T22:14:20+5:302015-04-10T00:23:41+5:30

शिक्षण विभागाचा निर्णय : परीक्षा वेळापत्रकात केला बदल--लोकमतचा दणका

Students will be evaluated from the 10th day | विद्यार्थ्यांचे मूल्यमापन दहा तारखेपासून

विद्यार्थ्यांचे मूल्यमापन दहा तारखेपासून

मांढरदेव : सातारा जिल्ह्यात ‘पाचवी ते आठवीपर्यंतच्या परीक्षांबाबत संभ्रमावस्था’ या सदराखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला जाग आली आहे. ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन पंधरा एप्रिलपासून सुरू होणाऱ्या परीक्षा आता दहा एप्रिलपासून सुरू करण्याबाबतचे परिपत्रक या विभागाने काढले आहे.
पाचवी ते आठवीपर्यंतच्या परीक्षा दरवर्षी १ एप्रिलला सुरू होतात. प्राथमिक शाळा वगळता माध्यमिक शाळांमध्ये या परीक्षा १ एप्रिलपासून सुरू असतात. मात्र, या परीक्षा १५ एप्रिलला घ्याव्यात,असा फतवा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने काढला होता. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. परीक्षेनंतर मूल्यमापन करण्यासाठी शिक्षकांकडे एकच आठवडा उपलब्ध होता. यात निकाल तयार करणे अवघड होते. विशेषत: माध्यमिक शाळांत पाचवी ते आठवी विद्यार्थी संख्या मोठी असते. येथे अनेक अडचणी निकाल तयार करताना येणार होत्या. आरटीई कायद्यानुसार ‘ड’ श्रेणी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपचारात्मक पूरक मार्गदर्शन करण्यासाठी परीक्षेनंतर पंधरा दिवस कालावधी उपलब्ध असणे आवश्यक असते. हा कालावधीदेखील पुरेसा उपलब्ध नव्हता, यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. त्यातच पालक व विद्यार्थी यांचे सुटीचे वेळापत्रक पूर्ण कोलमडले होते.
१५ एप्रिलला परीक्षा सुरू कराव्यात या फतव्याचे सातारा जिल्ह्यातील काही शाळांनी मान्य करून १५ एप्रिलला परीक्षा सुरू केल्या. मात्र, बऱ्याचशा शाळांनी या परीक्षा १ एप्रिल व सहा एप्रिलला सुरू केल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली होती. या परीक्षांमध्ये एकवाक्यता असणे आवश्यक आहे. (वार्ताहर)


परीक्षा पद्धतीत एकवाक्यता हवी
चालू वर्षीच्या गोंधळानंतर येणाऱ्या पुढील वर्षी तरी संबंधित शिक्षण विभागाने आरटीई कायद्यानुसार विद्यार्थ्यांचे कामाचे दिवस व मूल्यमापन पद्धतीचा अभ्यासपूर्वक विचार करून परीक्षा पद्धतीमध्ये एकवाक्यता आणावी, अशी मागणी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांकडून होत आहे.

Web Title: Students will be evaluated from the 10th day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.