विद्यार्थ्यांनी भागविली भक्तांची तहान
By Admin | Updated: February 9, 2015 00:47 IST2015-02-08T21:33:18+5:302015-02-09T00:47:08+5:30
कुसुंबी यात्रेत उभारली पाणपोई : ग्रामस्थांनी केले कौतुक

विद्यार्थ्यांनी भागविली भक्तांची तहान
कुडाळ : कुसुंबी, ता. जावळी येथील काळेश्वरी देवीच्या यात्रेत दरवर्षी महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून अनेक भाविक हजेरी लावतात. त्यामुळे या यात्रेला एक अनोखे महत्त्व असते. यात्रेत देवीच्या दर्शनासाठी भाविक पहाटेपासून रांगेत उभे असतात. अशा भाविकांना यात्राकाळात पिण्याचे पाणी रांगतेच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कुसुंबी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दोन ठिकाणी पाणपोई उभी करून भाविकांना जागेवरच पाणी वाटप करीतआहेत. विद्यार्थ्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे भाविकांकडून कौतुक होत आहे.विविध स्पर्धांमध्ये यशस्वी परंपरा सांभाळणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमाद्वारे सामाजिक बांधिलकीचे अनोखे दर्शन घडवले आहे. त्याचबरोबर शाळेत दिल्या जाणाऱ्या संस्काराचे दर्शनही घडवले आहे.
या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातूनही भाविक गर्दी करतात. काळेश्वरी देवस्थान ट्रस्ट या भाविकांना, यात्रेकरूंना विविध सुविधा पुरविण्याचे काम करीत असते. तरी देखील ट्रस्टच्या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी शाळेच्या वतीने कुसुंबी यात्रेत पाणीपोई सुरू करून भाविकांची तहान भागविली तसेच विद्यार्थ्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले
आहे. विद्यार्थ्यांनी राबवलेल्या या उपक्रमात शाळेतील प्रदीप टपळे, तुकाराम शेलार, शीतल बुधावले, लहू पिंपळे यांनीही सहभाग नोंदविला. तर शाळेने राबवलेल्या या उपक्रमाचे भाविकांसह काळेश्वरी ट्रस्टचे अध्यक्ष किसनशेट चिकणे, राम कदम, व्यवस्थापन अध्यक्ष संतोष चिकणे, तुकाराम वेंदे, साधू चिकणे, जयसिंग चिकणे आदींसह ग्रामस्थांनी कौतुक केले. (प्रतिनिधी)
काळेश्वरी देवीच्या यात्रेत सहभागी झालेल्या भाविकांना सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने शाळेतील ५२ विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीतून राबविलेला पाणपोईचा उपक्रम कौतुकास्पद होता.
-तुकाराम शेलार, शिक्षक कुसुंबी शाळा
पाणी घ्या पाणी
मंदिर परिसरात भाविक काळेश्वरी देवीचा जयघोष करीत होते. यात्रेचा जागराचा दिवशी शेकडो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यासाठी विद्यार्थ्यांनी पाणपोईसाठी दोन-चार बॅरेल स्वच्छ पिण्याचे पाणी भरून ठेवले होते. व सकाळपासूनच विद्यार्थी रांगेतील भाविकांना ‘पाणी घ्या पाणी’ करत पाण्याची सोय करीत होते.