दहावी, बारावी पुरवणी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:44 IST2021-08-14T04:44:12+5:302021-08-14T04:44:12+5:30
सातारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहेत. ...

दहावी, बारावी पुरवणी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत
सातारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोराेनामुळे महाराष्ट्र शिक्षण बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. अंतर्गत मूल्यांकनानुसार निकाल जाहीर करण्यात आला. जुलै-ऑगस्टमध्ये हा निकाल जाहीर करण्यात आल्याने महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी पुरवणी परीक्षा सप्टेंबरमध्ये आहे. दहावी, बारावीचे पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेंतर्गत आणि तुरळक विषय घेऊन बसलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागविण्यात येणार आहेत. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावा लागणार आहे.
माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत पुनर्परीक्षार्थी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी तसेच तुरळक विषय घेऊन बसलेले विद्यार्थी नियमित शुल्कासह १८ ऑगस्टपर्यंत अर्ज भरावेत तसेच विलंब शुल्कासह १९ ते २१ ऑगस्ट दरम्यान अर्ज सादर करावेत, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी २३ ते २४ ऑगस्टअखेर बँकेत चलनाद्वारे शुल्क भरायचे आहे, अशी सूचना बोर्डाने दिली आहे.
माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी २५ ऑगस्टपर्यंत विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करायच्या आहेत. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन माध्यमातून अर्ज भरायचे आहेत. तसेच या तारखांमध्ये कोणताही बदल केला जाणार नसल्याचे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
..................