शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना लागली आस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:11 IST2021-02-05T09:11:41+5:302021-02-05T09:11:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वडूज : खटाव तालुक्याला शैक्षणिक वारसा असून पाचवी ते आठवीचे वर्ग शासनाचे आदेश व मार्गदर्शक सूचनांनुसार ...

शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना लागली आस!
लोकमत न्यूज नेटवर्क
वडूज : खटाव तालुक्याला शैक्षणिक वारसा असून पाचवी ते आठवीचे वर्ग शासनाचे आदेश व मार्गदर्शक सूचनांनुसार तब्बल दहा महिन्यांनंतर बुधवार, दि. २७ जानेवारीपासून सुरू होत आहेत. गेले नऊ-दहा महिने घरी राहून कंटाळलेले विद्यार्थी आनंदीत झाले असून, त्यांना शाळेत जाऊन मित्र-मैत्रिणींना भेटण्याची ओढ लागली आहे.
शिक्षकांनाही विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. त्यामुळे जसे पाडुरंगाच्या भेटीला वारकरी संप्रदाय उत्सुक असतो, त्याचप्रमाणे विद्यार्थी-शाळा व शिक्षक यांच्यातील अतूट नात्यामुळे एक श्रद्धापूर्वक नाते निर्माण झाल्याने ‘भेटी लागे जीवा’ असेच म्हणावे लागेल.
शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाकडून सर्व ती खबरदारी घेत तयारी सुरू आहे. दरम्यान, शिक्षकांच्या कोरोना टेस्ट व सॅनिटायझेशन आदी कामे सुरू करण्यात आलेली आहेत. सुमारे दोन हजार शिक्षकांच्या कोरोना टेस्ट अंतिम टप्यात सुरू आहेत. पाचवी ते आठवीची खटाव तालुक्यातील शाळा, शिक्षक व विद्यार्थी संख्या पुढीलप्रमाणे : जिल्हा परिषद : ८९ शाळा, ३४२ शिक्षक, तर २ हजार ३८५ विद्यार्थी. शिक्षण विभाग : एक शाळा, ३ शिक्षक, तर २१ विद्यार्थी. खासगी अंशत: अनुदानित : एक शाळा, २४ शिक्षक, तर १६२ विद्यार्थी. खासगी अनुदानित : ५७ शाळा, ६८३ शिक्षक, तर १० हजार ९१४ विद्यार्थी. खासगी विनाअनुदानित ५ शाळा, १३ शिक्षक तर ७१ विद्यार्थी. स्वयंअर्थसहाय्यता १५ शाळा, १३६ शिक्षक , तर ७५१ विद्यार्थी. समाजकल्याण अनुदानित ४ शाळा, २९ शिक्षक, तर २१० विद्यार्थी. समाजकल्याण विनाअनुदानित २ शाळा, १२ शिक्षक, तर ५८ विद्यार्थी आहेत. असे एकूण मिळून १७४ शाळा, १२४२ शिक्षक, तर १४ हजार ५७२ विद्यार्थी.
सलग नऊ ते दहा महिने घरी राहून अनेक विद्यार्थी कंटाळलेले आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे खेळण्यासह अनेक बाबींवर निर्बंध आलेले आहेत. विद्यार्थी शाळेत जाणार असले तरी त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर मात्र कोरोनामुळे काहीशी चिंता जाणवत आहे. शाळेत गेल्यावर आपल्या मित्र-मैत्रिणींना भेटता येईल याची ओढ अनेकांना लागली आहे.
कोट...
शाळा बंद असल्यामुळे ऑनलाईन शिक्षण सुरू होते. बंद खोलीतील शिक्षण व ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे शैक्षणिक उत्साह कमी होत चालला होता. मात्र शाळा सुरू होत असल्याने प्रत्यक्षात अध्यापन होणार असून, काही कठीण भाग शिक्षकांकडून समजावून घेता येईल.
- हर्ष भोसले, इयत्ता सहावी
कोट..
बुधवारी शाळा सुरू होत असल्याने आम्हाला प्रत्यक्षात शिक्षण घेऊन शिक्षक आणि मित्रांना भेटायचा योग येईल. शालेय जीवन काय असते व कायम लक्षात राहण्यासाठी कोरोनाची महामारी कायम स्मरणात राहील. या शालेय जीवनाचा आनंद पुन्हा अनुभवण्यासाठी शाळेत येतोय.
- वैष्णव गोडसे, इयत्ता आठवी