नोकरीची हमी नसल्याने विद्यार्थ्यांची डी.एड्.कडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:45 IST2021-09-12T04:45:15+5:302021-09-12T04:45:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची गरज आहे. मात्र, त्यांच्या भरतीबाबत राज्य सरकारकडून कोणतेही ठोस पाऊल उचलले ...

नोकरीची हमी नसल्याने विद्यार्थ्यांची डी.एड्.कडे पाठ
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची गरज आहे. मात्र, त्यांच्या भरतीबाबत राज्य सरकारकडून कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नसल्याने विद्यार्थ्यांनी डीएडकडे पाठ फिरविली आहे. दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून आणि भरतीसाठी आवश्यक असणारी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरीची हमी नसल्याने विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणे टाळले आहे.
अध्यापक शिक्षण पदविका अर्थात डी.एड. अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्जासाठी पूर्वी संघर्ष करावा लागत होता. मात्र गुरुजी बनविणाऱ्या या विद्यालयांच्या वाट्याला आता मात्र एकटेपण आले आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये डी.एड. अभ्यासक्रमाला अल्प प्रतिसाद मिळत असल्याने ही महाविद्यालयेही अडचणीत आली आहेत. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी शिक्षक होतात. मात्र नंतर नोकरी मिळविण्यासाठी पुन्हा सीईटी देणे अनिवार्य असते. या काही कारणांमुळे विद्यार्थी डी.एड.च्या अभ्यासक्रमाकडे पाठ फिरवू लागले आहेत.
डी.एड.चा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर हमखास नोकरी मिळते, असा गेल्या दोन दशकांचा समज मोडीत निघाला आहे. शिक्षकभरतीबाबत जोपर्यंत राज्य शासनाकडून ठोसपणे कार्यवाही झाली नसल्याने गेल्या सहा वर्षांपासून या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल कमी होऊ लागला आहे.
चौकट :
वशिला अन् अपेक्षापूर्तीनेच दमछाक
शिक्षण घेताना डोनेशनच्या रूपाने आणि नोकरी लागतानाही वशिल्याच्या नावाने बहुतांश विद्यार्थ्यांना आर्थिक आव्हानांना सामोरे जावे लागते. सीईटी भरती प्रक्रियेवेळी संस्थाचालकांची अपेक्षापूर्ती करताना दमछाक होते. संस्थांमध्ये वशिला व पैसा नसल्याने डिग्री घेऊनही फायदा नसल्याने फक्त नावापुढे एक पदवी इतकाच उपयोग असल्याची भावना झाल्याने या अभ्यासक्रमाकडे कोणी फिरकण्याचे धाडस करीत नाहीत.
डी.एड.साठी मुलींच्या संख्येत वाढ
शिक्षक म्हणून नोकरी करण्यासाठी प्रवेश घेणाऱ्यांमध्ये मुलींच्या संख्या जास्तीची दिसते. लग्न करताना डी.एड. ही पदवी मुलींना उपयुक्त ठरते. दुसरे म्हणजे अद्यापही कुटुंबात महिलांचा पगार हा दुय्यम मानला जातो. त्यामुळे डी.एड.ची पुंगी वाजली तर वाजली नाही तर नुसतीच मिरविली हे मुलींना करणं शक्य होतं; पण आर्थिक सक्षमता ही मुलांच्या लग्नासाठी प्राथमिक अट असल्याने मुले मात्र याकडे पाठ करीत आहेत.
म्हणून फिरविली जाते पाठ
शिक्षकभरतीवरील मर्यादा
खासगी संस्थांच्या शाळांमधील देणगी पद्धती
सीईटी व टीईटीची वेळखाऊ प्रक्रिया
बेरोजगारांची फौज
नोकरीची हमी नसणे
डी. एड. कॉलेजला मोठ्या प्रमाणात दिलेली मान्यता. टीईटीसारख्या पात्रता परीक्षा घेऊन निव्वळ तोंडाला पाने पुसणे, शासनाच्या अशा निर्णयाचे हे परिणाम आहेत. शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत; पण शिक्षण भरतीत सातत्य न ठेवल्यामुळे बेरोजगारांची फौज तयार झाली आहे. भविष्यातील त्यांची परिस्थिती अधिक विदारक असणार आहे.
- अतुल शहा, शिक्षणतज्ज्ञ, सातारा
चांगल्या मार्कांनी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरी मिळेल याची खात्री नाही. सहा वर्षांत शिक्षकांची भरतीच झाली नाही. खासगी संस्थांकडे नोकरीसाठी किमान १० लाख रुपयांपर्यंतची मागणी केली जाते. शेतकरी कुटुंबातील आमच्यासारख्यांना उच्चतम शिक्षण घेऊन ही रक्कम भरणे अजिबात शक्य नाही.
- जीवन जाधव, सातारा